बृजभूषणविरुद्ध एफआयआर उघड : अनेकदा विनयभंग: नको त्या ठिकाणी स्पर्श
-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दाखल केलेले दोन्ही FIR आता समोर आलेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बृजभूषण व सचिव विनोद तोमर यात मुख्य आरोपी आहेत. प्रौढ कुस्तीपटूंनी आरोप केला आहे की, बृजभूषण यांनी त्यांचा अनेकदा विनयभंग केला. त्यांना वाईट हेतूने स्पर्श केला. श्वास तपासण्याच्या नावाखाली त्यांचे टी-शर्टही काढले.
एफआयआरनुसार, बृजभूषण यांनी कुस्तीपटूंच्या पोटाला हात लावल्याचा आरोप केला आहे. जखमी महिला खेळाडूचा खर्च असोसिएशनने उचलण्यासाठी त्यांनी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. खेळाडूंनी यास नकार दिला असता त्यांनी चाचणीमध्ये त्यांच्याशी भेदभाव केला.
दुसऱ्या एफआयआरनुसार, बृजभूषण यांनी अल्पवयीन कुस्तीपटूला बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले. तिथे त्यांनी तिचे शोषण करण्याचा प्रयत्न केला. पण, ती कशीतरी तिथून निसटली.
पहिल्या एफआयआरमध्ये आरोप
1. बृजभूषण यांच्यापासून वाचण्यासाठी कुस्तीपटू एकटीने नव्हे तर समूहात चालत असत
भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354A (लैंगिक छळ), 354D (पाठलाग करणे) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत पहिला एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एफआयआरमध्ये बृजभूषण आणि WFI सचिव विनोद तोमर यांची नावे आहेत.
तक्रारकर्त्यांपैकी एका महिलेने आरोप केला आहे की, सर्व महिला खेळाडू त्यांच्या संबंधित खोलीतून बाहेर पडत तेव्हा आपण आरोपींच्या हाती लागू नये यासाठी त्या समूहाने फिरत असत. अन्य एका महिला कुस्तीपटूने म्हटले आहे की, एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेवेळी एका हॉटेलमध्ये जेवताना तिला स्पर्श केला.
बृजभूषणच्या या कृत्याने तिला मोठा धक्का बसला. पुढचे काही दिवस ती नीट झोपू शकली नाही आणि नीट जेवू शकली नाही. भारतातील लीग दरम्यान दिल्लीतील फेडरेशन कार्यालयात आणि 2 वर्षांत 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याने पुन्हा या महिला पैलवानाला अयोग्यरित्या स्पर्श केला.
तक्रारदाराचा दावा आहे की, पीएमओमध्ये झालेल्या बैठकीतही त्याने वारंवार लैंगिक, भावनिक, शारीरिक, शारीरिक आघातावर भाष्य केले.
2. उपचाराच्या नावाखाली शारीरिक संबंधांची मागणी
फिर्यादीचे म्हणणे आहे की, बृजभूषणने आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदा तिच्यावर लैंगिक शोषण केले. तेव्हा त्यांनी तिचे कथितपणे टी-शर्ट काढले. श्वास तपासण्याच्या नावाखाली तिला अयोग्यरित्या स्पर्श केला.
एका महिला खेळाडूचा दावा आहे की, त्या चॅम्पियनशिपवेळी तिला दुखापत झाली. त्यानंतर मायदेशी परतल्यानंतर तिला फेडरेशनच्या कार्यालयात बोलावण्यात आले. तिथे बृजभूषण यांनी कथितपणे तिला सांगितले की, तिने त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तर फेडरेशन तिच्या उपचाराचा खर्च उचलण्यास तयार आहे.
3. तपास समितीने वारंवार बंद केले कॅमेरे
खेळाडूच्या म्हणण्यानुसार, ती WFI प्रमुखांविरुद्ध लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पॅनेलच्या सदस्यांसमोर कॅमेऱ्यात दिसली. या वेळी रेकॉर्डिंग डिव्हाइस वारंवार बंद केले जात होते, त्यामुळे तिच्या विधानाशी छेडछाड केली गेली असावी असा विश्वास त्याला वाटू लागला.
4. फेडरेशन कार्यालयात बळजबरीचा प्रयत्न
बृजभूषण यांनी तिला आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपवेळी तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. त्यानंतर ती नवी दिल्लीतील फेडरेशनच्या कार्यालयात गेल्यानंतर जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. लैंगिक छळ आणि पाठलाग या घटनेने तिला मानसिक धक्का बसला आहे.
या कृत्यांमुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. त्यामुळे तिला विविध स्पर्धांवर लक्ष केंद्रित करणे आणि स्वतःच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करणे कठीण झाले होते.
. पोक्सो कायद्याच्या दुसऱ्या एफआयआरच्या 2 खास गोष्टी
1. फोटोच्या बहाण्याने हात घट्ट पकडले
दुसरी तक्रार अल्पवयीन खेळाडूच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात वडिलांनी 2016 सालची घटना सांगितली आहे. तक्रारीनुसार, खेळाडूचे सध्याचे वय 17 वर्षे आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, या अल्पवयीन महिला कुस्तीपटूने भारतातील एका चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले, तेव्हा बृजभूषण शरण सिंह याने फोटो काढण्याच्या बहाण्याने तिला बळजबरीने आपल्याकडे खेचले. त्यानंतर त्याने तिच्या हाताला एवढे घट्ट पकडले की तिला हालचाल करता आली नाही. मग मुद्दाम तिच्या खांद्याखालून हात सरकवला.
एफआयआरमध्ये लिहिले आहे – बृजभूषण यांनी पैलवानाला सांगितले की, तू मला पाठिंबा दे, मी तुला साथ देईन, संपर्कात रहा. त्यावेळी खेळाडूने सांगितले होते की, सर, मी माझ्या बळावर येथे आले आहे, मेहनत करून पुढे जाईन.
त्यानंतर बृजभूषण यांनी तिला इशारा दिला की आशियाई चॅम्पियनशिपच्या चाचण्या लवकरच होणार आहेत आणि ती त्याला सहकार्य करत नसल्याने तिला चाचण्यांमध्ये परिणाम भोगावे लागतील.
2. खोलीत बोलावून जबरदस्तीचा प्रयत्न, खेळाडू पळून गेली
तक्रारदाराचा दावा आहे की, बृजभूषण यांनी अल्पवयीन खेळाडूला आपल्या खोलीत बोलावले. तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तिने तेथून पळ काढला असता तिच्याशी आशियाई चॅम्पियनशिपच्या चाचण्यांवेळी भेदभाव करण्यात आला. तिने आरोपीच्या लैंगिक छळाचा प्रतिकार केला. त्याच्या मागण्या मान्य करण्यास ती तयार नव्हती.
फिर्यादीत म्हटले आहे की, माझी मुलगी 17 वर्षांची तरुण कुस्तीपटू असून ती कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. ती आरोपींना तोंड देण्याचे धाडस दाखवू शकली नाही. त्यामुळे ती तक्रार करू शकली नाही किंवा फेडरेशनकडे हे मुद्दे मांडू शकली नाही. फेडरेशन पूर्णपणे आरोपीच्या नियंत्रणाखाली असून त्याच्या आदेशानुसार काम करते.


