बावनकुळे यांनी लिहिले पत्र; घरकुलाचा हप्ता मार्च अखेर

बावनकुळे यांनी लिहिले पत्र; घरकुलाचा हप्ता मार्च अखेर
– आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांना यश

प्रतिनिधी
नागपूर : महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत असलेल्या ९ तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (शहरी) बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचा अखेरचा हप्ता मार्च अखेरपर्यंत मिळणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून थकलेला हप्ता तातडीने देण्याची मागणी केली होती. यानंतर एनएमआरडीएला थकलेली रक्कम लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश मिळाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत घरकुलाच्या थकित निधीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही नेत्यांचे आभार व्यक्त केले आहे. तर थकित निधी मिळणार असल्याने घरकुलाच्या लाभार्थ्यांनीही आभार व्यक्त केले आहे.

केंद्र व राज्य शासनाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र. ४ अंतर्गत एकूण २०,४८० घरकुले मंजूर केली होती. त्यात राज्य शासनाचा हिस्सा १ लाख या प्रमाणे पूर्ण निधी प्राप्त झाला आहे. केंद्र शासनाचा हिस्सा १.५० लाख प्रमाणे २०,४६८ घरकुलाकरीता ३०७.०२ कोटी इतका आहे. त्यापैकी १२२.६० कोटी रुपये प्राप्त तर १८४.४२ कोटी निधी अप्राप्त असल्याने अखर्चित आहे.

डीपीआर १ मधील १८६६ मंजूर असून त्यापैकी ११८१ , डीपीआर २ मध्ये ९५२४ पैकी ८१२ आणि डीपीआर ३ मधील ९०७८ पैकी ९७ घरकुले अशी एकूण २०९० घरकुले पूर्ण झाली आहेत. या लाभार्थ्यांना १ लाख ६० हजारांचा हप्ता दिला असून उर्वरित ९० हजार रुपये थकीत आहेत. यामुळे पूर्ण झालेल्या घरकुलांना निधी देण्याची मागणी केली जात होती.

याची दखल घेत आ. बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, म्हाडाचे आयुक्त यांना पत्र लिहून निधी वितरित करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यावर म्हाडा आयुक्तांनी पत्र लिहून माहिती दिली की, दिल्ली यथे सीएसएमसीच्या आढावा बैठकीत एखाद्या प्रकल्पाचा वितरित केलेला अखर्चित निधी प्रगतीपथावरील दुसऱ्या प्रकल्पासाठी वितरित करण्यात यावा असे निर्देशित केले आहे. यामुळे एनएमआरडीएद्वारे निधी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आतापर्यंत १९१७ लोकांची नावे अपलोड करण्यात आली असून सर्व २०९० लाभार्थ्यांना थकित असलेला ९० हजारांचा निधी मार्चच्या अखेरपर्यंत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच उर्वरित लाभार्थ्यांना बांधकामाच्या प्रगतीनुसार निधी वितरित करण्यात येणार आहे.