पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीपासून; शिंदे गटाचे ३९ आमदार होणार अपात्र

पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीपासून; शिंदे गटाचे ३९ आमदार होणार अपात्र

-कपिल सिब्बल यांचा भावनिक संवादाने युक्तिवाद पूर्ण

प्रतिनिधी
नवी दिल्ली: शिंदे विरुद्ध ठाकरे सत्तासंघर्षाच्या बहुचर्चित खटल्यात ठाकरे गटाचे अॅड. कपिल सिब्बल यांनी सलग ३ दिवस युक्तिवाद केला. बुधवारी त्यांनी तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचे सहकारी अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनीही व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या शिंदे गटाच्या ३९ आमदारांना अपात्र घोषित करा, अशी मागणी केली. मात्र त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा का दिला, हा कळीचा प्रश्न उपस्थित केला.

जर बहुमत चाचणीत शिंदेंच्या ३९ आमदारांनी विरोधात मतदान केले असते व त्यामुळे ठाकरे सरकार पडले असते तर आम्ही त्या आमदारांना अपात्र ठरवू शकलो असतो. बहुमत चाचणीही रद्द केली असती. पण ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे आमदारांवर मतदानाची वेळच आली नाही व तुम्ही (ठाकरेंनी) हा अधिकार गमावला,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. दरम्यान, पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीपासून होईल. त्या वेळी शिंदे गटाला युक्तिवादाची संधी मिळेल.

राज्यघटना वाचवण्यासाठी मी उभा : अॅड. सिब्बल
‘सत्ता मिळवण्यासाठी पक्षांतरबंदी कायदा व राज्यघटनेतील इतर नियम दुर्लक्षित करून सारे काही करण्यात आले. मी इथे फक्त ही केस जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी उभा नाहीए, तर १९५० पासून आपण देशात जी राज्यघटना रुजवत आलो आहोत तिची नैतिकता जिवंत ठेवण्यासाठी मी इथे उभा आहे,’ असा भावनिक मुद्दा मांडत अॅड. सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला.