नानाभाऊ, कुठे गेले मृतकाच्या कुटुंबीयाचे 25 लाख रुपये ?
-काँग्रेस नेते कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबाविषयीचे वास्तव
गजानन ढाकुलकर
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत तिरंगा हातात घेऊन चालत असताना हृदयविकाराचा धक्क्याने काँग्रेस नेते कृष्णकुमार पांडे ऊर्फ के. के. यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर पांडे यांच्या कुटुंबीयांना प्रदेश काँग्रेसतर्फे 25 लाख रूपयांची मदत देण्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. मात्र दोन महिने उलटुनही ही मदत पांडे यांच्या कुटुंबीयांना न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
भारत जोडो यात्रेसाठी कृष्णकुमार पांडे नांदेड जिल्ह्यात गेले होते. 7 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी यात्रा सुरू होताच हाती तिरंगा घेऊन त्यांनी पदयात्रेत भाग घेतला. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते जयराम रमेश व दिग्विजय सिंह चालत होते. काही वेळानंतर पांडे यांना अस्वस्थ वाटायला लागले. त्यांनी झेंडा दुसऱ्या कार्यकर्त्याकडे दिला व चालत असताना अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने हॉस्पिटलला पाठवण्यात आले, पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
पांडे यांच्या मृत्यूनंतर नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पत्रपरिषद घेऊन 25 लाख रूपये देण्याचे जाहीर केले होते. “जनमानसाची शिदोरी’ या काँग्रेसच्या मासिकातही याची बातमी आली होती. मात्र दोन महिन्यांनंतरही ही मदत पांडे यांच्या कुटुंबीयांना न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अंतर्गत कलहामुळे नाना पटोले यांना पक्षातंर्गत फटाके लागलेले आहे.
माजी आमदार आशिष देशमुख यांनी पटोलेंच्या हकालपट्टीची मागणी केलेली आहे. अशात नानांना पदावरून दूर केल्यास मदत न मिळण्याची शक्यता जास्त आहे. असे असले तरी काँग्रेसचे पदाधिकारी ही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते.


