नागपुरात या महिला नेत्यांची पंतप्रधान मोदींवर आगपाखड
-राज्यसभा खासदार रंजीता रंजन यांचा इशारा
प्रतिनिधी
नागपूर : काँग्रेसने देशातील महागाई, बेरोजगारी आणि अदानीसारख्या उद्योगपतींना पंतप्रधानांनी केलेली मदत यावरच लक्ष केंद्रीत केले असल्याचे सांगतानाच काँग्रेस भाजपाचे मनसुबे तडीस जाऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रंजीता रंजन यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिला.
सावरकर यांच्या वर टिका करण्याच्या प्रश्नावर उत्तर देतांना रंजीता रंजन यांनी यावर बोलणार नसल्याचे सांगितले. आगामी काळात उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधाबद्दल देशभरात आंदोलन करण्यात येईल असे रंजन यांनी सांगितले.
24 तासाच्या आता राहुल गांधींना संसदेच्या बाहेर काढले. हा लोकशाहीवरील आघात आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते. लोकसभेत विरोधकांना बोलू दिले जात नाही. राहुल गांधींचा काही दोष नसताना कारवाई केली.
पण, काँग्रेस भीणार नाही आणि चुपही बसणार नाही. आम्ही भाजपाचे मनसुबे तडीस जाऊ देणार नाही. भाजपाकडून लोकशाहीचा खून केला जात आहे. संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. पण, समिती स्थापन केल्यास मोदी आणि अदानींची मैत्री जगजाहीर होईल अशी भीती भाजपाला वाटते. म्हणून ते समिती स्थापन करीत नसल्याचा आरोप रंजन यांनी केला.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते अदानीच्या विमानातून प्रवास करीत होते. तर मोदी पंतप्रधान झाल्या नंतर अदानी त्यांच्या विमानातून प्रवास करीत होते. हे संसदेत विचारणे गुन्हा आहे काय. चोराच्या मनात चांदणे आहे. विरोधक आंदोलने करतात मीडिया दाखवत नाही. पहिल्या दिवसापासून सत्ताधारीच राहुल गांधींच्या माफीची मागणी करीत होते. संसद सुरू राहु नये अशी त्यांची इच्छा होती असे त्या म्हणाल्या.
मोदी सरकारने मागील 9 वर्षात मित्रोंसाठी काम करत जनतेचा पैसा त्यांच्या खिशात घालण्याची व्यवस्था केली आहे. देशातील सर्व सरकारी उद्योग, कंत्राटे फक्त अदानींनाच बहाल केली आहेत. अदानी समुहात 20 हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला? हाच प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. हे 20 हजार कोटी रुपये कुठून आले ? याची चौकशी करण्याची हिम्मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवावी, असे आव्हान रंजन यांनी केले.


