दोन उपमुख्यमंत्री, एका मुख्यमंत्र्याची मध्यरात्री बैठक, हे ठरलंय!
-रविवारी राज्याच्या राजकारणात चर्चा
प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक झाली होती. ही बैठक दोन तास बैठक चालली. मात्र, या कोणत्या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्दयावरुन चर्चा झाली, हे समोर आलेले नाही. यावरुन रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. आता या बैठकीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
वर्षावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यामध्ये मंत्रीमंडळाच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’च्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, अजित पवार व देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे सत्तेत आल्यापासून आतापर्यंत सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झालेला नाही. त्यात अजित पवारांनी अचानक राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्याने मंत्रिपदाच्या खात्यात वाटेकरी वाढले आहेत. त्यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, शिंदे गटाच्या काही नेत्यांनीही मंत्रिपद मिळत नसल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सत्तेत तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात थोडी गडबड होणार असल्याची कबुली शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचे काय? असा प्रश्न अजूनही विचारला जात आहे.
राज्यात आताच्या परिस्थितीत नव्याने मंत्री झालेल्या मंत्र्यांकडेही अद्याप कुठल्याही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवलेली नाही. तर चौथ्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न तिन्ही नेत्यांकडून सुरू असल्याची चर्चा आहे. भाजप-शिवसेना (शिंदेगट) सरकारमधील अनेक मंत्र्यांवर दोन-दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. यामुळे अनेक मंत्र्यांना ही जबाबदारी संभाळताना तारेवरची करसरत करावी लागत असून या सर्व गोष्टींचीही चर्चा बैठकीत झाली असल्याची माहिती आहे.


