जिल्ह्यात काँग्रेसला दुसरा मोठा धक्का : केदारांचे विश्वासू मनोहर कुंभारे भाजपात

जिल्ह्यात काँग्रेसला दुसरा मोठा धक्का : केदारांचे विश्वासू मनोहर कुंभारे भाजपात

-हे ठरले प्रमुख कारण

गजानन ढाकुलकर
नागपूर : बुधवार(२७मार्च)ची सकाळ काँग्रेसला धक्का देणारी ठरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे सुनील केदार यांचे अत्यंत विश्वासू मनोहर कुंभारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पक्षप्रवेशाची बातमी आणि फोटो वायरल झाल्यानंतर कुणालाही हे होऊच शकत नाही, असे शब्द उदगारले. त्यांचा प्रवेश लोकसभेच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची चिंता वाढविणारा ठरणार असल्याची चर्चा आहे तर सावनेर मतदार संघात केदार यांच्यासमोर आव्हान उभे करणारे ठरणार आहे.

बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांच्या चेहर्‍यावर त्याची झलक दिसून येत होती. मनोहर कुंभारे यांना सावनेर विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा असून भाजपाला सोनबा मुसळेनंतर धनोजे कुणबी समाजातील चांगला नेता गवसला, हे बोलले जात आहे.

मनोहर कुंभारे यांनी व्यक्त केली खंत
सुनील केदार गत २५ वर्षांपासून सावनेरचे नेतृत्व करीत आहे. परंतु, शहराची लोकसंख्या वाढत असताना त्याप्रमाणात विकास झाला नाही. इतर शहराच्या तुलनेत सावनेर ५० वर्ष मागास आहे. गत दोन वर्षांपासून जिल्ह्यातील विकास कामे ठप्प आहे. शिवाय सुनील केदार यांच्या गटा-तटाच्या राजकारणाला कंटाळलो होतो. धनोजे कुणबी समाजावर अन्याय होत असल्याने सावनेरच्या विकासासाठी मोठा निर्णय घ्यावा लागला. आपल्याना कोणत्याही पदाची लालसा नसून सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करीत राहणार असल्याचे त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. सावनेर मतदार संघात महायुतीचा उमेदवार ३० ते ४० हजार मतांची आघाडी घेणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.