घणाघाती टीका : नार्वेकर निर्णय घेण्याऐवजी चालढकल करताहेत

घणाघाती टीका : नार्वेकर निर्णय घेण्याऐवजी चालढकल करताहेत
-संजय राऊत यांचा आरोप

प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनेशी द्रोह केला आहे, अशी घणाघाती टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. आजपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर शिवसेना आमदारांच्या पात्र-अपात्रते संदर्भातील महत्त्वाची सुनावणी सुरू होत आहे. मात्र, नार्वेकर निर्णय घेण्याऐवजी केवळ चालढकल करत आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला.

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय घ्यायचा आहे, हे स्पष्ट सांगितले आहे. राहुल नार्वेकरांना केवळ निर्णय घ्यायचा आहे. मात्र, राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय मान्य करण्यास तयार नाही. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय नार्वेकरांनी सहा महिन्यांपूर्वीच द्यायला हवा होता. आता अपात्रतेचा निर्णय घेण्यास अजून किती कालावधी लागणार सांगता येत नाही.

संजय राऊत म्हणाले, सध्या राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेबाबत सरकारने निर्णय घेण्यास टाळाटाळ केली. राज्यात एक फुल दोन हाफ सरकार आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्षांनीही आतापर्यंत टाळाटाळ केली. आता त्यांनी आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेऊ असे जाहीर केले आहे. मात्र महाराष्ट्रातील सरकारच बेकायदेशीर आहे.

संजय राऊत म्हणाले, राज्यात पूर्वी काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीचे सरकार होते. ते सरकार चुकीच्या पद्धतीने पाडण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह आधी 16 जण आणि नंतर काही आमदार अपात्र व्हायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळेच नंतर अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार फोडण्यात आले. ते देखील अपात्र आहेत, असे घटना सांगते.

राहुल नार्वेकरांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार घटनाबाह्य असल्याचे सांगितले आहे. तरीही ज्यांचा पक्षांतर करणे धर्म आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चालढकल करत आहेत. त्यांनी कायद्याशी आणि घटनेशी द्रोह केला आहे. एका वर्षापासून राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. अध्यक्षांनी घटनाबाह्य निर्णय घेतले. राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. घटनेवर ज्यांनी काम केले ते देखील सध्याची स्थिती पाहून स्वर्गात अस्वस्थ झाले असतील.

संजय राऊत म्हणाले, सध्याच्या सरकारच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे. अजित पवार जरी अनुभवी असले तरी सरकार चालवताना त्यांची दमछाक होत आहे. सरकारच्या दृष्टीने मराठा आंदोलनाचा मुद्दा किती गंभीर आहे हे आपल्याला क्लिप मधून दिसून आले आहे.