ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा; मटणपार्ट्यांचा बेत
– बार, ढाबे, रेस्टारंट फुल्ल
प्रतिनिधी
नागपूर ( महादुला ) : जिल्ह्यात गोधनी सर्कल अंतर्गत बोखारासह २५१ ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा काही दिवसांतच उडणार आहे. इच्छुकांनी मतदारांशी संपर्क करायला सुरुवात केली. तसेच काही गट्टा मतदान असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मटणपार्ट्यांचा बेत व विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. बार, ढाबे, रेस्टारंट फुल्ल पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार होण्याची चर्चा रंगत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जवळजवळ भाजपा आणि शिंदे यांच्या गटाकडे झुकले. त्यांना अधिक जागा मिळाल्यात. याच धर्तीवर भाजपा व शिंदेगटाने आघाडी केल्यास त्याचे निकाल सकारात्मक यायला लागेल, अशी चर्चा आहे. परंतु, गैरव्यवहाराचे आरोप नसलेल्यांना व जनमानसांत चांगली प्रतिमा असणाऱ्यांना मतदारांचा कौल मिळतो आहे. गोधनी सर्कलमध्ये बोखारा ही सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. हिंगणा मतदारसंघाचे राजकारण टिकवून ठेवण्यासाठी किंवा उमेदवार निवडून आणण्यासाठी येथील मतदान ‘किंगमेकर’ची भूमिका वठविते. त्यामुळे येथे कुठल्या पक्षाची सत्ता बसते. यावर पुढील समीकरणे अवलंबून आहे. येथील इच्छुक उमेदवारांचा प्रत्येक मतदारांशी ‘हर घर संपर्क’ सुरू आहे. काही बड्या नेत्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. राज्यातून महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर नागपुरातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते वगळता कुणाचाही आम जनतेशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्क नाही. सामान्य गरीब, कष्टकरी, शेतकरी, सर्वसमाजबांधवाशी नाळ असलेल्या दुसऱ्या फळीच्या नेतेमंडळींना तर काहीही घेणे-देणे दिसत नाही. मात्र, अजूनही वेळ गेली नाही. भाजपा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सातत्याने संपर्क पहायला मिळतो. ही बाब त्यांच्यासाठी जमेची आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे गृहसर्कल हाकेच्या अंतरावर आहे. त्यांना ही ग्रामपंचायत कुठल्याही स्थितीत जाऊ द्यायची नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात वेगळे चित्र याठिकाणी असेल, यामध्ये दुमत नाही.
-बैलवाडा येथे मेघे म्हणतात, मी विकासकामांची शेती करणारा शेतकरी
मी लोकांच्या भल्यासाठी विकासकामांची शेती करणारा शेतकरी आहे. आम्ही जो विकास करतो. त्यामुळे गावखेडे गतिमान होण्यासाठी मदत होते, असे प्रतिपादन हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांनी केले.
बैलवाडा येथे श्रीचक्रधरस्वामी, मंदिराच्या संरक्षक भिंतीच्या कामाच्या भूमिपूजनासाठी ते शनिवारी (२४ सप्टेंबर )दुपारी आले असता बोलत होते. याप्रसंगी सरपंच सचिन शेटे, उपसरपंच कीर्ती पवार, पिंटू जुमडे, किशोर निस्ताने, कल्पना वराले, दिलीप ढोके, ऋषी डाखोळे, संजय काकडे, रामाकृष्ण ढवले, मनोज उचके, कल्पेश जुमडे, दीपक जुमडे, काशीनाथ निस्ताने, दिलीप शेटे, शुभम जुमडे, बंटी धुर्वे, संजय मेहेर, मैत्रय गाडेकर, अर्पणा गाडेकर आणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पुढे मेघे म्हणाले, या विकासकामांमुळे गावाच्या प्रगतीला नक्कीच हातभार लागेल. बैलवाडा सरपंच सचिन शेटे यांनी प्रास्तविकातून म्हटले की, गावाला आतापर्यंत साडेसात वर्षांत ४० लाख रुपयांचा निधी आला. यापुढेही गावविकासासाठी सहकार्य राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


