खडाखडी : या नेत्याने काढली शिंदेसेनेच्या या नेत्यावर भडास
-युतीतील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर
प्रतिनिधी
नागपूर : राज्याच्या सत्तेत एकत्र आलेल्या शिंदेसेना व भाजपमधील ‘सुखी संसारा’त वर्षभराच्या आतच खडाखडी सुरू झाली आहे. यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी कल्याणमध्ये (ठाणे) थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्रालाच आव्हान दिल्याने शिंदेसेनेत अस्वस्थता आहे. त्यापाठोपाठ आता विदर्भातील रामटेकमध्येही (नागपूर) भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेचे आमदार आशिष जयस्वाल आणि खासदार कृपाल तुमाने यांच्यावर भडास काढली. वरिष्ठ नेते मात्र त्यावर मौन बाळगून होते. त्यामुळे युतीतील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रविवारी रामटेकमध्ये भाजपचा मेळावा झाला. त्यास निमंत्रित शिवसेना नेत्यांचा पाणउतारा करण्यात आला.
‘जयस्वाल यांनी रेड्डी यांचा पराभव केला. गेल्या चार वर्षांत ते पराभवातून बाहेर आलेले नाहीत. म्हणून त्यांना जयस्वाल भाजपच्या स्टेजवर येऊ नये असे वाटते. पण शिवसेना आणि भाजपची राज्यस्तरावर युती आहे. त्यामुळे आम्ही जयस्वाल व तुमाने यांना निमंत्रण दिले होते. रेड्डी यांनी रविवारी केलेली कृती चुकीची होती. निवडणूक झाल्यानंतर सर्वांनी जुने विसरून विकासाचे राजकारण करायचे असते. रेड्डी यांच्या कृतीवर मी जास्त बोलणार नाही,’ अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली.
रेड्डी म्हणाले, ‘मी तिन्ही नगर परिषदा निवडून आणल्या. ग्रामपंचायत, खरेदी-विक्री संघात विजय मिळवला. या विजयात तुमाने अाणि जयस्वाल यांचे काय योगदान आहे? माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढू नका. पण कमळाला पाडून विजयी झालेले जयस्वाल आता उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर हे मला मान्य नाही.’
-काय आहे नेमका वाद ?
रामटेक मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपच्या रेड्डी यांना पराभूत करून अपक्ष आशिष जयस्वाल विजयी झाले होते. नंतर जयस्वाल यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. सध्या ते शिंदेंसोबत आहेत.
यापूर्वी मी तीनदा युतीचा उमेदवार होतो. आताही मी युतीचा आमदार आहे. बावनकुळे आणि फडणवीस यांनी निमंत्रण दिल्यामुळे मी कार्यक्रमाला गेलो होतो. त्यामुळे रेड्डी यांचे पोट दुखण्याचे काही कारण नाही. आणि त्यांच्या पोटदुखीचे औषध माझ्याजवळ नाही. मी भाजप उमेदवाराचा पराभव केल्याचा आरोप रेड्डी यांनी केला, पण त्यांना जनतेने पराभूत केले. – आशिष जयस्वाल, आमदार, रामटेक


