कोविड सेंटर घोटाळा; मुंबईत 16 हून अधिक ठिकाणी ईडीच्या धाडी

कोविड सेंटर घोटाळा; मुंबईत 16 हून अधिक ठिकाणी ईडीच्या धाडी
– आणीबाणीच्या नावाखाली खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप

प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज मुंबईत 16 हून अधिक ठिकाणी छापेमारी केल्याचे समोर येत आहे.

ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, तसेच संजय राऊतांचे व्यवसायिक पार्टनर सुजित पाटकर यांच्या घरी ईडीने छापेमारी केली. आज सकाळी 8 वाजेपासून कोविड सेंटर घोटाळासंबंधी मुंबईत अनेक ठिकाणी ईडीने एकाचवेळी छापेमारीला सुरूवात केली. विशेषकरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीची ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे सोमवारीच (ता. 19) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत 12 हजार 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तत्कालीन मविआ सरकार हे घोटाळेबाज सरकार होते, असा आरोप करत हे सरकार भ्रष्टाचाराचा एक-एक पैसा वसूल करेल, असे फडणवीस म्हणाले होते. कॅगच्या अहवालातून मुंबई महापालिकेचा हा घोटाळा समोर आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्हटले आहे. तसेच, मुंबई महापालिकेच्या या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शिंदे सरकारने एसआयटीचीही स्थापना केली आहे.

मुंबई महापालिकेने ऑक्टोबर 2022 मध्ये सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला पाच कोविड सेंटर्सचे कंत्राट दिले होते. मात्र, मुंबई महापालिकेने कंत्राट दिले, त्यावेळी ही कंपनीच अस्तित्वात नव्हती. तसेच, ती नोंदणीकृत फर्म नसल्याचाही आरोप आहे. या घोटाळ्यात 100 कोटी रुपयांचे कंत्राट चुकीच्या पद्धतीने दिले. कोरोनाच्या काळात वैद्यकीय आणीबाणीच्या नावाखाली खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप मुंबई पालिका प्रशासनावर करण्यात येत आहे. याशिवाय, कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेने एप्रिल 2020 मध्ये रेमडेसिव्हिरची एक कुपी 1568 रुपयांना विकत घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तर, सरकारी हॉफकिन संस्थेने तेच औषध 668 रुपयांनी विकत घेतले होते. या कालावधीत बीएमसीने 2 लाख कुपी खरेदीचे कंत्राट दिले होते.

दरम्यान, ईडीच्या कारवाईवरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, मुंबई पालिकेत कोविड काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आम्ही सातत्याने या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला आहे. आता ईडीने कारवाईस सुरूवात केली आहे. त्यामुळे ठाकरेंनी जनतेचे पैसे कुठे खर्च केले, याचा हिशोब त्यांना द्यावाच लागेल.