कॉंग्रेसला फोडण्यासाठी मुंबईतून ऑपरेट होतेय सूत्र !

कॉंग्रेसला फोडण्यासाठी मुंबईतून ऑपरेट होतेय सूत्र !
-शिंदे पॅटर्न नागपूर जि. प. त राबविण्याच्या हालचाली
– नानांसह नाराज भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती
प्रतिनिधी
नागपूर : काँग्रेस पक्षाची दुसरी बैठक नुकतीच झाली. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना कंभालेंसह तिघेजण गैरहजर होते. नागपुरातील सत्ता घालविण्यासाठी मुंबईतून सर्व सूत्र ऑपरेट होत असल्याची माहिती आहे.

काँग्रेसचा नाराजांचा गट हा सातत्याने भाजपच्या संपर्कात आहे. विरोधी पक्ष नेता, जिल्ह्यातील एक बडा नेता व्हाया मुंबई कनेक्शन आहे. भाजपच्या १६ सदश्य सभागृहात आहे. नाराजांची संख्या ही ७ च्या जवळपास आहे. आणखी सात सदस्यांची जुळवाजुळव सुरु आहे. नावे फिक्स असून अशा सदस्यांचा सातत्याने संपर्क सुरु असल्याचे सूत्र सांगतात. राज्यात झालेल्या सत्तांतराप्रमाने शिंदे पॅटर्न नागपूर जि. प. त राबविण्याच्या हालचाली सुरु आहे. तुपामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

हा सर्व गड नानांनी सांभाळल्याची प्रथमदर्शनी बाब पुढे येत आहे. पक्षाने बंडखोरी होऊ नये म्हणून अध्यक्ष, उपाध्यक्ष या दोन्ही पदाचे उमेदवार ऐनवेळी घोषित करण्याची भूमिका घेतली. सद्य:तरी नाना एकाहाती बंडखोरीची ‘ढालतलवार’ घेऊन मैदानात आहे. रिपिट सभापितपद हवे आहे, ते पदाधिकारी या सर्व घडामोडीत मदत करीत असल्याची माहिती आहे. सोमवारी(१७ ऑक्टोबर) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी बैठका घेतल्या. काँग्रेसच्या बैठकीत तीन सदस्य अनुपस्थित होते. यातील दोघांनी प्रकृतीचे कारण तर एकजण न्यायालयीन कामासाठी बैठकीला अनुपस्थित असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसच्या चिंतेत भर पडली.
काँग्रेस सदस्यांची ही दुसरी बैठक होती. या बैठकीला माजी मंत्री, आमदार सुनील केदार, माजी मंत्री तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते नाना गावंडे, सुरेश भोयर आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेत्यांनी सदस्यांची मते जाणून घेतली. सदस्यांनी त्यांची पक्षाप्रतीची निष्ठा कायम ठेवण्याचा सल्ला दिला. पक्षात गटबाजीला थारा देऊ नका असे, आवाहन केले. सत्तापक्ष काँग्रेसकडे अनुसूचित जमातीतून अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेत्या शांता कुमरे, मुक्ता कोकड्डे, देवानंद कोहळे, प्रीतम कवरे, पिंकी कौरती, नीलिमा उईके आणि शंकर डडमल हे दावेदार आहे. त्यातील डडमल हे एका प्रकरणात आरोपी आहे.

-त्यांचा उपाध्यक्षपदावर डोळा
काँग्रेसचे सदस्य नाना कंभाले यांनी पदाधिकाऱ्यांविरुद्ध भूमिका घेतली. आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे ते उघड सांगत होते. मात्र, हे पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने त्यांचा उपाध्यक्षपदावर डोळा आहे. त्यासाठीच त्यांची फिल्डींग असून ते काँग्रेसचे काही सदस्य फोडण्याच्या प्रयत्नात आहे. आजच्या बैठकीतील अनुपस्थितीने त्याला बळ मिळाले.

-राष्ट्रवादीत खुमखुमीची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची हिंगणा तालुक्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद नाकारणे, निधी वाटपातील दुजाभावामुळे त्यांच्यात खुमखुमी आहे. काही सदस्यांनी वेगळी भूमिका व्यक्त केली. काँग्रेसमध्ये बंड झाल्यास राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरेल.

-भाजपा नाराजांच्या संपर्कात
भाजपाने नाराजांना गळाला लावणे सुरू केले आहे. उद्या, शनिवारी भाजपाची बैठक आहे़ त्यानंतर भाजपा आपली स्पष्ट भूमिका जाहीर करेल. या बैठकीत काय ठरतात, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.