आज १५० कोटींचा घोटाळ्याचा निकाल : सुनील केदारांच्या अडचणी ?
-संपूर्ण राज्याचे लक्ष
प्रतिनिधी
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे ? नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा खटल्याचा निकाल आज, २८ नोव्हेंबर जाहीर करण्यात येणार आहे. सुमारे १५० कोटी रुपयांचा या रोखे घोटाळा प्रकरणात माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सुनील केदार हे आरोपी आहेत. २००१-२००२ मध्ये बँकेच्या या घोटाळ्याच्या वेळी सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते.
१९९९ साली सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकचे अध्यक्ष होते. बँकेच्या रकमेतून २००१-०२मध्ये होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स .लि. आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या. सहकार विभागाचा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही रक्कम गुंतवण्यात आली होती. पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.
पुढे या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटला भरण्यात आला. या कंपनीशी निगडित देशभर घोटाळे झाले. यात एकूण चार राज्यांमध्ये एकूण १९ ठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्या सगळ्यांमध्येच प्रतिभूती दलाल म्हणून काम करणारे केतन सेठ आरोपी आहेत. हे सगळेच खटले एका ठिकाणी चालवावेत, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर ५ ऑक्टोबर २०२१ रोजी न्यायालयाने तूर्त या खटल्यांची सुनावणी थांबविण्याचे आदेश दिले होते.
मात्र, पुढे सर्वोच्च न्यायालयात या आदेशात बदल केले. या खटल्यातील युक्तिवादाची शिल्लक असलेली प्रक्रिया पूर्ण करावी, मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीखेरीज निकाल सुनावला जाऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार सर्व पक्षांतर्फे युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी आणि अॅड. देवेन चौहान यांनी केदारांकडून युक्तिवाद केला. याखेरीज चौधरी यांच्याकडून त्यांचे वकील अशोक भांगडे यांनी युक्तिवाद केला. अखेर, या प्रकरणाचा निकाल सुनावण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्यानुसार, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पूरकर २८ नोव्हेंबर रोजी या खटल्याचा निकाल सुनावतील.


