असे काय झाले संसद सोमवारपर्यंत झाली ठप्प?
– 20 मिनिटांत गुंडाळण्यात आले कामकाज
प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधी शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील 5 व्या दिवसाचे कामकाज अवघ्या 20 मिनिटांत गुंडाळण्यात आले.
सभागृहातील नारेबाजीमुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले. तत्पूर्वी, काँग्रेस खासदारांनी राहुल गांधी यांना बोलू देण्याच्या समर्थनार्थ नारेबाजी केली. तर सत्ताधारी भाजपचे सदस्य मागील 4 दिवसांपासून राहुल गांधी यांच्या केंब्रिजमधील भाषणाप्रकरणी माफीची मागणी करत आहेत.
दुसरीकडे, राज्यसभेचे कामकाजही सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. राहुल गांधी गुरुवारी संसदेत आले होते. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन सभागृहात बोलण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती.
दुसरीकडे, भाजपने त्यांच्या माफीची मागणी केली आहे. भाजपच्या निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून राहुल गांधी यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या विधानाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचीही मागणी केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा आजचा 5 वा दिवस आहे. यापूर्वीच्या 4 दिवसांत राहुल गांधींचे लंडन स्थित केंब्रिज विद्यापीठातील भाषण व अदानी प्रकरणी तीव्र गदारोळ झाला होता.
–म्हणतात,संसद व देशाची प्रतिमा मलिन
खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींच्या विधानाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. दुबे म्हणाले की, राहुल गांधी यांनी युरोप व अमेरिकेतील आपल्या विधानांमुळे सातत्याने संसद व देशाची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे त्यांना संसदेतून निलंबित करण्याची वेळ आली आहे. त्यांचे लोकसभा सदस्यत्व समाप्त करण्यात मदत केली जावी.
दुसरीकडे, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एक व्हिडिओ जारी करत राहुल गांधी यांच्या माफीची मागणी केली आहे. ते म्हणाले – दुर्दैवाने काँग्रेस देशविरोधी कृतीत सहभागी झाली आहे. जनतेने वारंवार झिडकारल्यानंतरही राहुल गांधी देशविरोधी टूलकिटचे स्थायी सदस्य बनलेत.


