हे आहे कारण: आघाडीचा मनोरा कोसळण्याचे, शिवसेनाकडून तडजोड अशक्य
-राजकीय अभ्यासकांचा निष्कर्ष
प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा – विधानसभा निवडणुकांना अजून एक वर्ष बाकी असताना जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा सुरू झाली. शिवसेना – भाजपातही आज ना उद्या याच मुद्द्यावरून संघर्षाची वेळ येईल. २०१९ च्या विधानसभेतील संख्याबळाचा विचार केल्यास शिंदेसेनेला २८८ पैकी ८० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता नाही. तर, यापूर्वी युतीत १५० जागांचा आग्रह धरणाऱ्या व आता शक्तिपात झालेल्या उद्धव सेनेचीही मविआत ५० च्या आत जागांवर बोळवण होऊ शकते. पुन्हा सत्तेसाठी शिंदेसेना जे पदरात पडेल ते घेईल; पण मविआचे नेतृत्व करणारी उद्धवसेना मात्र इतक्या कमी जागांवर तडजोड करणार नाही. यातूनच आघाडीचा मनोरा कोसळण्याची शक्यता जास्त आहे.
सध्या युतीसोबत २० अपक्ष आमदार. टक्केवारीनुसार त्यांच्या वाट्याला ३४ जागा येतील. मात्र विद्यमान २० आमदारांना तिकीट देऊन उर्वरित १४ जागा भाजप व शिंदेसेना आपसात वाटून घेतील. तसे झाल्यास शिंदे गट ८० तर भाजप १९४ जागांवर लढू शकेल.
– मविआचे नेतृत्व करत असलेल्या उद्धवसेनेच्या वाट्याला टक्केवारीच्या प्रमाणात ३८ जागा येतात. त्यात दोन्ही काँग्रेसने त्यांच्यासाठी थोडासा हात सैल केला तर १० ते १२ जागांची वाढ होऊ शकते. मात्र ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत.
– आपल्याला राज्यभर सहानुभूती असल्याने उद्धवसेना जास्त जागांसाठी आग्रही असेल. परिणामी जागावाटपावर मतैक्य होण्याची शक्यता कमीच. त्यामुळे बिघाडीचीच शक्यता जास्त. (ज्याचे शरद पवारांनी आताच संकेत दिले आहेत)
-जागावाटपाच्या चर्चेतच आघाडीत बिघाडी ही कारणे
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा १ व भाजपचे ४ आमदार विजयी झाले. काँग्रेसचा १ तर राष्ट्रवादीचे २ आमदार आहेत. शिवसेनेचा १ आमदार शिंदे गटात आहे.
सीएमपदी राष्ट्रवादी भक्कम दावा करेल. पण ज्याचे जास्त आमदार त्यांचा सीएम यासाठी काँग्रेस आग्रही असेल. म्हणून दोघेही जागांबाबत तडजोड करणार नाहीत.
–काय होऊ शकेल?
– भाजप – शिंदे गट एकत्रच निवडणुका लढतील, यात अजिबात शंका नाही.
– आघाडीत बिघाडी झाल्यास राष्ट्रवादी १६० व उद्धव सेना १२८ अशी तडजोड करून एकत्र लढू शकतील. उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे नेतृत्व मान्य करू शकतील. (त्याशिवाय पर्यायही राहिलेला नाही)
– आघाडीत राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांचे नेतृत्व काँग्रेस कदापिही मान्य करण्याची शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेस एेनवेळी स्वतंत्र लढण्याचा पर्यायही निवडू शकते.


