हा नेता म्हणतो; विरोधी पक्ष म्हणजे पिसाळलेले कुत्रे

हा नेता म्हणतो; विरोधी पक्ष म्हणजे पिसाळलेले कुत्रे
-सत्तार यांची टोकाची टीका थांबत नाही तोच प्रकार
-विरोधकांकडून सर्वत्र टीकेची झोड
प्रतिनिधी
नाशिक : सध्या विरोधी पक्षाची सत्ता गेल्याने ते पिसाळलेले कुत्रे या प्रमाणे वागत असल्याची जहाल टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यावर केली. विरोधी पक्षांनी जनतेच्या प्रश्नावर बोलायला हवे, मात्र हे एकमेकांवर आरोप करण्यात गुंतलेले आहे. कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत आहे, तसे खंजीर आता राहिलेले नाही असे वक्तव्यही त्यांनी केले.

शिंदे गटातील अनेक आमदारांच्या वादग्रस्त टीकेनंतर आता सदाभाऊ खोत यांनीही विरोधकांवर जहाल भाषेत टीका केली आहे. ते नाशिक जिल्हा दौऱ्यावर असुन त्यांनी संघटनेच्या आगामी परिस्थितीची माहिती दिली. यावेळी अधिक माहिती देतांना त्यांनी राज्य शासनाला कानपिचक्या ही दिल्या.

– फडणवीस सरकारला घरचा आहेर

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा एकेकाळचे भारतीय जनता पार्टीचे सहकारी पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी दिला. तसेच अतिवृष्टीच्या काळात कृषीमंत्री, पणन मंत्री आणि सहकार मंत्री यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देवून मदत करण्याची गरज होती, त्यामुळे या मंत्र्यांनी आता तरी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरावे असा सल्ला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे.

– राज्य शासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

खोत म्हणाले, राज्यात सध्या उस उत्पादकांना एफआरपी प्रमाणे दर दिला जात नाही, मात्र शासन त्या संबधित कारखान्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ज्या कारखान्यांनी उसाला एफआरपी दिला नाही त्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करुन तेथील संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली. जर शेतकऱ्यांना लवकरात लवकर एफआरपी मिळाला नाही,तर रस्त्यावर उतरुन राज्य शासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला.

-विरोधी पक्ष म्हणजे पिसाळलेले कुत्रे

सध्या विरोधी पक्षाची सत्ता गेल्याने ते पिसाळलेले कुत्रे या प्रमाणे वागत असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यावर गंभीर आरोप केला. विरोधी पक्षांनी जनतेच्या प्रश्नावर बोलायला हवे, मात्र हे ऐकमेकांवर आरोप करण्यात गुंतलेले आहे. कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत आहे, तसे खंजीर आता राहिले नाही, असा विरोधकांवर म्हणजे राजू शेट्टी, शिवसेनेने भाजपाच्या आणि भाजपाने सदाभाऊला अद्यापही मंत्रीपद न दिल्याने आरोप करीत एकाच दगडात तीन पक्षी मारले आहे.

-काँग्रेसने नागरिकांना काहीच दिले नाही

काँग्रेस हा देशातील जुना पक्ष असुन त्याचे नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रा करीत आहे. मात्र काँग्रेसने देशातील नागरिकांना काहीच दिले नाही. त्यामुळे त्यांनी भारत जोडो यात्रेपेक्षा काशीला जाऊन गंगेत स्नान करुन पापमोक्ष होण्याचा सल्ला देत यात्रेला पापमुक्त यात्रा नाव देवून काँग्रेसवर आरोप केला. ज्यावेळी महाविकास आघाडीच्या हातात सत्ता होती, त्यावेळी ठाकरे पितापुत्र घरात बसले. हातातुन सत्ता गेल्यानंतर बांधावर फिरायला लागले. हातात काहीच नाही तेव्हा फिरून काही उपयोग नाही. फक्त दौरे करुन मगरीचे अश्रू पुसत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर केला.