सुषमा अंधारे पुन्हा बरसल्या : ललित पाटील प्रकरणात या नेत्याचाही सहभाग
-राज्याच्या राजकारणात खळबळ
प्रतिनिधी
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला बेड्या ठोकल्यानंतर त्याने गौप्यस्फोटांची मालिका सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. मी ससून रुग्णालयातून पळालो नाही मला पळवलं गेलं असा स्फोटक दावा ललित पाटीलने केला. याआधी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप करत, ललित पाटील प्रकरणात दादा भुसे यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर आता ललित पाटीलच्या दाव्यानंतर सुषमा अंधारेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ललित पाटीलला पळवून लावण्यात राजकीय नेते सहभागी आहेत. ललित पाटीलसोबत दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांची देखील नार्को टेस्ट करा. याचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपवा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. इतकंच नाही तर ससून रुग्णालयाच्या डीनची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.
दरम्यान, ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले होते. ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात मंत्री दादा भुसे यांच्या सोबत अजून दोन मंत्र्यांचा समावेश आहे, असा दावा सुषमा अंधारेंनी 13 ऑक्टोबरला केला होता. या दोन्ही मंत्र्यांची नावं लवकरच पुढे आणू, असंही त्या म्हणाल्या होत्या. दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड तपासा, पुरावे लवकरच समोर आणणार, असा दावा अंधारेंनी केला होता.
दादा भुसे यांची चौकशी करा तसेच पुण्याच्या ससूनचे माजी डीन काळे, ससूनचे लॅन्डलाईन यांचे देखील कॉल रेकॉर्ड चेक करा. तसेच ललित पाटील कोण हे मला माहित नाही असे भूसे सांगतात, पण ललित पाटील यांना मातोश्रीवर दादा भूसे घेऊन आले होते, हे खोटे आहे का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, काँग्रेसचे पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्वात आधी याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन, ससून ड्रग्ज प्रकरणात राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप केला होता. ललित पाटीलच्या पळून जाण्यामागे राज्यातील मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता. मात्र, यावेळी त्यांनी कोणाचं नाव घेतलं नव्हतं. पण सुषमा अंधारे यांनी धंगेकरांच्या आरोपानंतर थेट दादा भुसे यांचं नाव घेतलं होतं.
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीच्या आधारे आपल्यावर आरोप केले आहेत, त्यामध्ये तथ्य नसल्याचा दावा राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी केला. तसेच चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचंही दादा भुसे म्हणाले होते.


