सुषमा अंधारेंनी का म्हटले, बाळा, तुझ्या आईने नवीन पायवाट…!
प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे गटात सहभागी झालेल्या नेत्या सुषमा अंधारे या आपल्या धडाकेबाज भाषणांनी चांगल्याच चर्चेत आल्यात. आजच त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तत्पूर्वी सुषमा अंधारे यांनी वाघमारे यांनी केलेल्या टीकेवर उत्तर दिले होते.आता त्यांनी मुलीला एक भावनिक पोस्ट लिहीली असून या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे. ही पोस्ट जशास तशी…
प्रिय कब्बू,
तू फक्त 45 दिवसांची होती. तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं.. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता. पण अख्ख कुटुंब पाठीशी उभा राहिलं.. विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला. दुबईत दोन तास बोलुन मी आल्या पावली घारी सारखी तुझ्याकडे झेपावले.
बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत… बेहत्तर.. पण तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..!
तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही. पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखविला. ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगले विश्लेषण करतात.
बाबासाहेब लिहितात, “ जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत. त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील. पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील..! भय , भ्रम , चरित्र हत्या ही मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा ”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर


