साहित्य क्षेत्रातील राजकारण नेत्यांपेक्षा भयानक : गिरीश गांधी
-साहित्यिक रुसले का एकमेकांकडे जेवायलासुद्धा जात नाही
-प्रताप वाघमारे यांच्या ‘सांजार्त’ चे थाटात प्रकाशन
गजानन ढाकुलकर
नागपूर : साहित्य क्षेत्रातील राजकारण नेत्यांपेक्षा भयानक आहे. ते टीका करतात आणि मांडीला मांडी लावून लगेच जेवायला बसतात. मात्र,साहित्य क्षेत्रात तसे नाही. साहित्यिक रुसले, फुगले की जन्मभर वैर असल्यागत वावरतो, असे स्पष्ट भाष्य वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी केले.
सावनेर तहसीलदार व कवी प्रताप वाघमारे यांच्या पहिल्या सांजार्त काव्यसंग्रहाचे प्रकाशन विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात रविवारी(९ एप्रिल)सायंकाळी पार पडले. विदर्भ साहित्य संघ आणि वल्लरी प्रकाशन पुणे यांच्यातर्फे हा सोहळा आयोजित होता. त्यावेळी गांधी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.तीर्थराज कापगते, ज्येष्ठ कवयित्री सना पंडीत व प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, प्रताप वाघमारे, रचना प्रताप वाघमारे यांची उपस्थिती होती. पुढे गांधी म्हणाले, प्रमाणभाषेसोबत बोली भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रशासनात न्यायाची अपेक्षा थोडी दूरच अशी खंत व्यक्त करताना प्रताप यांनी शिलगून राहत पुढील काम करीत रहावे. सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणे प्रत्येकाला जगता आले पाहिजे.प्रशासकीय सेवेत एखादे काव्य कमी झाले तरी चालेल त्याने काही बिघडणार नाही. परंतु, कार्यात खंड पडता कामा नये.कमिटमेंट लक्षात ठेवाव्यात, असे सूचक डॉ़ गांधी यांनी केले.

सुरुवातीला कवी वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रवींद्र शोभणे म्हणाले, जो कागदावर लिहितो तो कविहृदयाचा असतो. महसूल अधिकाऱ्यांना कधी फायलींच्या पलीकडे जाता येत नाही. परंतु, प्रताप वाघमारे यांची सांजार्त म्हणजे फायलींच्या पलीकडील सर्जनशिल माणसाची अवस्था आहे.
प्रत्येक कवितेच्या मागे एक अनुभव असतो. प्रताप यांच्या कवितेत प्रेमभावना काठोकाठ भरल्या आहेत. मागणीनुसार वाड:मय प्रकार बदलत जातो. सध्याचा कवीचा भाव पुढे असेल असे नाही. मात्र, त्यांची कविता वेगळ्या पद्धतीची वाट आखते. आव्हान आणि व्यवधानातून ती आणखी मजबूत होत जाते आणि कवीचे बोट घट्ट पकडून ठेवत असल्याचे डॉ.शोभणे म्हणाले. कवयित्री सना पंडित यांनी भाष्य करताना कवींच्या कविता अनेक लहान गोष्टीतून सहज समृद्ध करून जाते. भाव, भावार्थ आणि कवितेतील प्रत्येक ओळ कल्पनेतील असली इतरी निसर्गाकडे पाहण्याचा प्रामाणिक दृष्टीकोन अभिप्रेत करते. डॉ. तीर्थराज कापगते भाष्य करताना म्हणाले, सांजार्त आर्तता आणि व्याकुळता सांगते. निसर्गाचा भाव असलेली संध्याकाळ तिची कुस अनेकदा गोंजारते. जीवनाचे दोन रूपे वाघमारे यांनी बघितली आहे. त्यांच्या कवितेतून ते अनेकादा प्रत्ययास येते. शब्दनिर्मितीचा विलक्षण वेग असलेले कवी आणि कवितानिर्मिती सांजार्त आहे. त्यासोबत मला कविता का लिहायची आहे, याचे उत्तरसुद्धा कवी वाघमारे यांच्या कविता देते.
अध्यक्षीय भाषणात काव्यसंग्रहाचे स्वरूप व मेहनत सौंदर्यशास्त्राचे भान ठेवून घेतल्याची नोंद अध्यक्ष प्रदीप दाते यांनी केली. सर्वसामान्यांपर्यंत गरजा पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्यास सांजार्ताचा खरा अर्थ साध्य होईल, असा संदेश देत शुभशीर्वाद दिले. विष्णू मनोहरांच्या खुशखुशीत काव्याने उपस्थितांत नवा उत्साह भरला. संचालन वृषाली देशपांडे यांनी केले. आभार संदीप दाभेराव यांनी मानले. कार्यक्रमाला कवी, साहित्यिक व कलाप्रेमींची बहुसंख्येने उपस्थिती होती.


