सव्वा तास चर्चा: पवार भेटीतील गुपित राऊत यांनी केले उघड
-महाविकास आघाडीत आलबेल
प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी ‘बी प्लॅन’वर काम करत आहे. शरद पवारांची भाजप अनुकूल भूमिका हा त्याचाच भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपला अनुकूल वक्तव्ये करणाऱ्या शरद पवारांच्या खेळीमुळे अस्वस्थ झालेले उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री ‘सिल्व्हर ओक’वर धाव घेतली. तिथे उद्धव, शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे व संजय राऊत या चौघांमध्ये सुमारे सव्वा तास खलबते झाली. यातील चर्चेचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला आहे. मात्र, आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी या भेटीबाबत महत्त्वाची माहिती दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, मोदींची पदवी, अदानींची जेपीसी चौकशी, ईव्हीएम या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस व उद्धव सेनेशी विसंगत भूमिका घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत दुफळी निर्माण झाली. शिवसेनेत फूट पडल्याने सत्तेतून पायउतार व्हावे लागलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी ‘बी प्लॅन’वर काम करत आहे. शरद पवारांची भाजप अनुकूल भूमिका हा त्याचाच भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पवार याचे खंडन करत असले तरी मित्रपक्षांना मात्र त्यांच्या खेळीची धास्ती वाटतेय. यापूर्वी सावरकरांच्या मुद्द्यावर पवारांनी राहुल गांधींचे कान टोचले, आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडताना आम्हाला विचारले नव्हते, अशी वक्तव्ये करून पवार आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आणत आहेत.


