सर्वेक्षण; दक्षिण मुंबईत भाजपचे देऊळ पाण्यात

सर्वेक्षण; दक्षिण मुंबईत भाजपचे देऊळ पाण्यात
-आज ४८ लोकसभा, २८८ विधानसभा मतदारसंघाचा आढावा

प्रतिनिधी
मुंबई : २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे असलेली दक्षिण मुंबई लोकसभेची जागा जिंकणे भाजपसाठी सर्वात आव्हानात्मक असू शकते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने घेतलेल्या अंतर्गत सर्वेक्षण आणि आढाव्यात हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबईत भाजपला विजय सोपा दिसतो, तर शिंदे गटाकडे असलेल्या दोन जागांबाबत भाजप सावध भूमिकेत आहे.

शुक्रवारी भाजपने राज्यातील सर्व ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. आमदारांसमोर त्यांच्या कामगिरीचे प्रगतीपुस्तक मांडण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक जागेवर पक्षाला जिंकण्यास किती वाव आहे, याबद्दल त्यांचा अभिप्राय विचारण्यात आला.

“गेल्या वेळेप्रमाणे लोकसभेच्या ४४ जागा जिंकणे कठीण होईल. जर मुस्लिम मते एकत्रित झाली आणि या समुदायाने धोरणात्मक निर्णय घेत मतदान केले, तर मोठी समस्या उभी राहील, असेही सूत्रांनी सांगितले. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या युतीबाबतही अस्वस्थता आहे.

मुंबईत लोकसभेच्या सहा जागांपैकी, उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई भागात भाजप सुरळीतपणे मार्गक्रमण करेल, अशी अपेक्षा पक्षाला आहे. या दोन्ही जागांवर भाजपचेच खासदार आहेत. इतर काही जागांबाबात निवडणुका जवळ येतील, तसे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात वांद्रे येते, जिथे खुद्द उद्धव ठाकरे राहतात आणि तिथे मुस्लिम लोकसंख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे कमी मताधिक्याने विजय मिळू शकतो, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.