सरकारला झालंय काय? महाराष्ट्र जीआरमध्ये हिंदी राष्ट्रभाषा
-जीआरवरून नव्या वादाला तोंड
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या एका जीआरमध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख केला आहे. मुळात भारत सरकारने अद्याप कोणत्याच भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या या जीआरवरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मनसे नेते अनिल शिदोरे यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाच्या जीआरमध्ये प्रस्तावनेतील पहिलेच वाक्य आहे की, ‘हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे…’ कधी कधी जाहीर झाली हिंदी ही राष्ट्रभाषा? हिंदी ही इंग्रजीसोबतची शासनाची प्रशासकीय भाषा किंवा औपचारिक भाषा आहे असा आमचा समज आहे.. कृपया खुलासा करावा.
–हिंदीचे लाड कशाला?
यासोबतच मराठी एकीकरण समितीनेही या जीआरमधील या वाक्यावर तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मराठी एकीकरण समितीने म्हटले आहे की, अधिकारी व मंत्र्यांच्या डोक्यात नक्की मेंदू आहे का? कीडे तर लागले नाही ना? आम्हाला शंका आहे की सांस्कृतिक विभाग अधिकारी नशा करत असतील, विशेष समिती स्थापन करून तपासण्या करा. हिंदी राष्ट्रभाषा कोणी व कधी केली? मुळात मराठी राज्यात हिंदी लादण्याचे षडयंत्र का? काय संबंध?
–काय आहे नेमके आदेशात
काल सोमवारी (ता. 16) महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने हा जीआर जारी केला आहे. ‘हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे हिंदी साहित्याच्या उन्नतीसाठी व उत्तेजनासाठी राज्यामध्ये हिंदी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली आहे’, अशी पहिलीच ओळ या जीआरमध्ये आहे. हिंदी साहित्य अकादमीचे अध्यक्ष व इतर सदस्यांच्या नियुक्त्या या जीआरच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.


