समीर मेघेंच्या वाढणार अडचणी: देशमुखांची घड्याळ रोखणार कमळ!
-पक्ष प्रवेशाच्या हालचालीने बंग गोटात धाकधूक
-घोडमारेंसह अनेकांच्या राजकारणाला बसणार कट
गजानन ढाकुलकर
नागपूर : आपल्या सततच्या वक्तव्याने वाद ओढवून घेणारे व स्पष्ट वक्ते डॉ. आशिष देशमुख यांचा राष्ट्रवादी पक्षातील प्रवेश जवळपास निश्चित समजला जात आहे. ते राष्ट्रवादीचे हिंगणा मतदारसंघाचे उमेदवार असतील. त्यामुळे आगामी काळात भाजपा आमदार समीर मेघे यांच्या अडचणीत चांगलीच भर पडणार आहे.
याशिवाय, राष्ट्रवादीला भक्कम चेहरा देशमुख यांच्या रूपातून पक्षाला मिळेल. देशमुख यांच्या पक्ष प्रवेशाने बंग गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. देशमुख आल्यास बंग यांचे महत्व आपोआपच कमी होईल, असे बोलले जाते. मात्र, माजी आमदार विजय घोडमारे यांच्या सारख्या ‘के’ लॉबीची देशमुख यांना साथ मिळाल्यास देशमुख यांच्या घडीची टिकटिक अधिक वेगाने धावेल. त्यातही डॉ. आशिष देशमुख यांच्यासाठी हिंगणा मतदार संघ नवीन नाही. त्यांचा कारभार प्रशस्त लता मंगेशकर रुग्णालयामार्फत सातत्याने सुरू आहे. ते जनतेच्या संपर्कात आहेच. त्यांनी मागीलवेळी पूर्व पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढवून विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रक्तदाब वाढविला होता. राष्ट्रवादीने मागील काळात घोडमारे यांनी दिलेली तिकीट व दरम्यान, कुणी काय राजकारण केले, कसे कुणाकडे पाणी भरले, याचे सर्व रिपोर्टींग हायकमांडपर्यंत पोहचले आहे. एक सक्षम उमेदवार म्हणून देशमुख यांच्याकडे बघितले जाते. थेट आवाहन अंगावर घेणारा नेता म्हणूनही देशमुख यांची ओळख आहे. त्यांच्या एन्ट्रीमुळे बंग यांचे पारंपरिक राजकारण आणखी बॅकफुटवर जाईल, असेही राजकीय जाणकार सांगतात.

देशमुख यांच्या टीमकडून मेळाव्याची तयारी देखील सुरू झाली आहे. भाजपाच्या ताब्यात असलेल्या हिंगणा मतदारसंघातून येत्या निवडणुकीत निवडणूक लढायची, अशी ठोस इच्छा डॉ.आशिष देशमुख यांची आहे. पक्षाने त्यांना होकार भरल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवार, शरद पवार आणि इतर नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर नुकतेच शरद पवार नागपूर दौऱ्यावर आले. त्यावेळी त्यांनी देशमुख यांच्या शेतावर भेट दिली होती. ही भेट ‘साखर’पेरणीतून ‘राजकीय’ पेरणी होती, अशीही चर्चा झाली होती.
याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते राष्ट्रवादीचा मोठा मेळावा हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये होईल. आशिष देशमुख या मेळाव्यात शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठ्या संख्येने बोलविणार आहेत. हेच त्यांचे शक्तिप्रदर्शन सुद्धा असेल. याच मेळाव्यात देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. हिंगणा मतदारसंघात भाजपा विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रबळ आणि तगडा उमेदवार नाही. बंग यांना पुत्र प्रेझेंटेशन करण्याशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादीत महिला आहेत. जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती उज्वला बोढारे यांचे नाव अग्रेसर आहे. त्यांचे येत्या काळात बंग यांच्याशी खटके उडालेत. त्यामुळे अंतर्गत विरोध कायम आहे. त्या बंगनंतर सक्षम उमेदवार आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिंगणा मतदार संघात अधिक भक्कम करायचा असेल देशमुख यह नाम ही काफी है, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या मतदारसंघात आगामी निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार म्हणून डॉ.आशिष देशमुख पुढे येऊ शकतात आणि नवा करिष्मा करून दाखवू शकतात, अशी चर्चा मतदारांत आहे.


