संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ

-राष्ट्रपती म्हणाल्या, हा विकसित भारत घडवण्याचा काळ

प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करत आहेत. मुर्मू यांचे आगमन होताच संपूर्ण सभागृहाने त्यांचे टेबल वाजवून स्वागत केले.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, संसदेच्या या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना मला आनंद होत आहे. काही महिन्यांपूर्वीच देशाने आपल्या स्वातंत्र्याचे 75 वर्षे पूर्ण करून अमृतकालमध्ये प्रवेश केला. अमृतकालचा 25 वर्षांचा काळ हा स्वातंत्र्याचे सुवर्ण शतक आणि विकसित भारत घडवण्याचा काळ आहे.

आपल्यासमोर एक युग निर्माण करण्याची संधी आहे. यासाठी 100 टक्के कार्यक्षमतेने काम करावे लागेल. आपल्याला 2047 पर्यंत असे राष्ट्र घडवायचे आहे. ज्यात भूतकाळाचे वैभव आणि आधुनिकतेचा प्रत्येक सुवर्ण अध्याय आहे. आपल्याला स्वावलंबी भारत बनवायचा आहे. जो मानवी जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम आहे. गरीबी नसावी, मध्यमवर्ग श्रीमंत असावा. तरुणांनी काळाच्या दोन पावले पुढे व्हावे, असा भारत असावा.

अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले – आजचा दिवस महत्त्वाचा आहे. राष्ट्रपती मुर्मू पहिल्यांदाच संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करत आहेत. या सभागृहात वाद होतील, वाद व्हायलाही हवेत.

मोदी म्हणाले,  विरोधक पूर्ण तयारीनिशी आले आहेत. आम्ही खूप चांगले मंथन करून देशासाठी अमृत काढू. आपल्या देशाचा अर्थसंकल्प जग पाहत आहे. या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. जग आपल्या देशाकडे आशेने पाहत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांचा पक्ष, आप व केसीआर यांचा पक्ष बीआरएससह अनेक विरोधी पक्ष राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकू शकतात. त्याचवेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. महागाई, चिनी सैन्याची घुसखोरी, बीबीसी डॉक्युमेंट्री, काश्मिरी पंडितांची सुरक्षा, राम रहीमचा पॅरोल, हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि अदानी या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरू शकतात.

आम्ही सर्व मुद्द्यांवर चर्चास तयार
याआधी सोमवारी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत 27 पक्षांचे 37 नेते उपस्थित होते. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, बैठक चांगली झाली. सभागृहाचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी आम्ही विरोधकांचे सहकार्य मागतो. आम्ही सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहोत. या बैठकीला काँग्रेस आणि सपाचे नेते उपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, काँग्रेस पक्षाने पत्र लिहून कळवले होते की, हवामानामुळे ते काश्मीरमध्ये अडकले आहेत, त्यामुळे त्यांचे नेते येऊ शकले नाहीत. 31 जानेवारीला पक्षाकडून स्वतंत्रपणे चर्चा केली जाईल.