संजय राठोड, भावना गवळीच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ
– उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर दाखल
-राज्यात वेगवान राजकीय घडामोडी
प्रतिनिधी
नागपूर : प्रथम शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने या पक्षांचे प्रमुख शरद पवार व उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहे. शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवातही झाली असून त्यांनी कालच येवला येथून रणशिंग फुंकले. तर, आजपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे.
दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे आज सकाळीच मुंबईहून रवाना झाला आहेत. उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर दाखल झाले आहेत. जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे दुपारी पोहरादेवीचे दर्शन घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे या दौऱ्यात विदर्भातील पाच जिल्ह्यांतील शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी 4 वाजता ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहे. फुटीनंतर पक्ष मजबूत करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांना आपल्याकडे रोखून धरण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. यापूर्वी मातोश्रीवर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर सहमती झाली होती. राज्यात वेगवान राजकीय घडामोडी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांचा हा दौरा होत असल्याने याकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.
-उद्धव ठाकरे यांचा आजचा दौरा
-दुपारी 2 वाजता पोहरादेवीचे दर्शन
-दुपारी 3 वाजता यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा
-दुपारी 3.30 वाजता वाशीम जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा.
-सायंकाळी 4 वाजता यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद.
-बंडखोरांची कोंडी करण्याची रणनिती
शरद पवार यांनी नाशिकमधून आपला महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. तर, उद्धव ठाकरे हे आज विदर्भापासून आपल्या दौऱ्याला सुरूवात करत आहेत. महाराष्ट्राच्या दोन विरोधी टोकांकडून दौऱ्याला सुरूवात करत बंडखोरांविरोधात जनमत निर्माण करण्याचा उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे आज आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर या पाच जिल्ह्यांतील शिवसैनिकांशी संवाद साधणार असून प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्यासाठी विदर्भातील शिवसैनिकांनीही जय्यत तयारी केली आहे.
-पोहरादेवीच्या दर्शनाने दौऱ्याची सुरुवात
बंजारा समाजाची काशी अशी ख्याती असलेल्या यवतमाळमधील दारव्हा-दिग्रस येथील पोहरादेवीचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. दुपारी दोन वाजता ते दारव्हा-दिग्रस येथे दाखल होणार आहेत. या दौऱ्यातून शिंदे गटात गेलेले आमदार संजय राठोड यांना ठाकरे गटाकडून आव्हान दिले जाणार आहे.
-शिंदे गट आणि भाजपचा जोरदार शब्दांत प्रहार
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडण्यात आला. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी संवाद साधणार आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या फुटीवर काय भाष्य करतात, याकडे लक्ष असणार आहे. या दौऱ्यात शिवसैनिकांशी संवाद साधतानाच ते शिंदे गट आणि भाजपचा जोरदार शब्दांत समाचार घेण्याची शक्यता आहे.
-उद्या, सोमवारचा उद्धव ठाकरेंचा दौरा
-सकाळी 11 वा. अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा.
-सकाळी 11.30 वा. अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा.
-दुपारी 1 वा. अमरावती व अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद.
-सायंकाळी 6 वा. नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद.
-स्थळ : डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर


