संघभूमीत येऊन संजय राऊतांचे फडणवीस, बावनकुळेंना आव्हान
– भाजपचे लोकसभेला दीडशेही निवडून येणार नाही
विवेक पाटील/ गजानन ढाकुलकर
नागपूर : आगामी २०२४ च्या निवडणुकीत भाजप विरोधातील सर्व लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व मिळून एकास एक उमेदवार दिला तर भाजपचे लोकसभेला दीडशेही निवडून येणार नाही असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. आज नागपूर विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले, नागपुरला भाजपचा गड म्हणता, असे खूप गड आम्ही पाहिले. सभा होऊ नये यासाठी सरकारने आणि काही लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. याचा अर्थ या गडातच त्यांच्या पोटात गोळा आला आहे. नागपुरातील सभेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहाणार आहे. भाजपा विरोधात महाराष्ट्रात रान पेटवू.
संजय राऊत म्हणाले, भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर व्यापक आघाडी करण्याचे प्रयत्न आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधीही लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.
भारत हे हिंदु राष्ट्र आहे आणि राहिल असे व्टिट भाजपाने फडणवीस यांच्या छायाचित्रांसह केले होते. पण, भारत हे हिंदुराष्ट्र नाही असे कोण म्हणाले. बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर या सगळ्यांनी भारत हे हिंदूराष्ट्र असल्याचे सांगितले आहे. पण याचा अर्थ फक्त राजकारणासाठीच हिंदुत्वाचा वापर करायचा असा नाही. हिंदुत्वाच्या अनेक विषय आणि विचारांवर चिंतन करावे लागेल. हिंदुत्वावरील हे चिंतन नागपुरातच करावे लागेल असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.
संजय राऊत यांचा सकाळचा भोंगा बंद करण्यात यावा असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नेहमी म्हणत असतात. त्यांना ही भीती असली पाहिजे. अशी भीती असणे गरजेचे आहे. त्यांना माझ्यामुळे रोज रात्री झोप येत नाही.


