शरद पवार स्पष्ट बोलले; मी अजून काम करू शकतो

शरद पवार स्पष्ट बोलले; मी अजून काम करू शकतो
-सेवानिवृत्त का व्हायचे ?

प्रतिनिधी
पुणे : मी निवृत्त का व्हायचे? मी अजून काम करू शकतो, काम करण्याची क्षमता माझ्यात आहे. मी कोणत्या वयात निवृत्त व्हायचे? कुठे थांबायचे? हे मला माहिती आहे. असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना दिले आहे. दोन जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत टीका केली होती.

दोन जुलै रोजी पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन जुलैपासूनच पक्ष बांधणीला पुन्हा एकदा सुरुवात केली होती. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेण्यासाठी आज पोहोचले आहेत. याआधी त्यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर प्रतिहल्ला करत निवृत्तीच्या वयाबाबत स्पष्ट केले आहे.

-संपूर्ण पक्षाने मला निवृत्त होऊ नका

मी का निवृत्त व्हायचे? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. मी अजून काम करू शकतो माझ्यात काम करण्याची क्षमता आहे. मी आधी निवृत्त होण्याचे ठरवले होते, त्यावेळी संपूर्ण पक्षाने मला निवृत्त होऊ नका, असे सांगितले. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील नागरिक रडू लागले होते. मी निवृत्त व्हायचे नाही, असे त्यांनी मला सांगितले. त्याच लोकभावनेचा मी आदर केला आणि राजीनामा मागे घेतला. मात्र, आता मला कोणीही निवृत्त व्हा? असे का सांगत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी लोकांमध्ये जातो, त्यांचे प्रश्न मांडतो, यात चुकीचे काय? मी ज्या पक्षाचा अध्यक्ष आहे, त्या पक्ष संघटनेच्या वाढीसाठी काम करतोय. आणि मी कोणत्या वयात थांबले पाहिजे, हे तुम्ही मला का सांगत आहात? मी माझा निर्णय घेऊ शकतो, असे देखील ते म्हणाले.

-वयाचा प्रश्न येत नाही

सातत्याने माझ्या वयाचा संदर्भ काढला जातो. मोरारजी देसाई कोणत्या वयात पंतप्रधान झाले होते हे देशाला माहिती आहे. मात्र, मला आता पंतप्रधान व्हायचे नाही किंवा मंत्री देखील व्हायचे नाही. मला संघटनेचे काम करायचे आहे. त्यामध्ये वयाचा प्रश्न येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

-आधी देखील माझ्यावर अशी वेळ

मला नवी पिढी तयार करायची आहे. नवे नेतृत्त्व तयार करायचे आहे, हे माझे काम आहे आणि मी ते करत राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. जे घडलं ते माझ्यासाठी झटका नव्हता. या आधी देखील माझ्यावर अशी वेळ आली होती. या अशा परिस्थितीला कसे तोंड देतात ते मला माहिती आहे. पक्ष कसा उभा करायचा हे माझ्या डोक्यात तयार आहे. जे लोक गेले त्यांचे मला अजिबात वाईट वाटले नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी असे मत व्यक्त केले आहे.

-भाजपासोबत चर्चा पुढे नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली असल्याचे मान्य केले आहे. मात्र, आमच्या दोन्ही पक्षाची विचारधारा वेगवेगळी असल्याने, आमची चर्चा पुढे जाऊ शकली नसल्याचे ते म्हणाले आहे.