वाचा सविस्तर ; ठाकरेंचा फडणवीसांना मैत्रीचा हात
-कटुता संपवा आणि कामाला लागाचे आवाहन
-‘सामाना’तून स्तुतीसुमने व प्रसंगी चिमटे
प्रतिनिधी
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचा वाद शिगेला पोहोचला. या दोन्ही पक्षात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळतेय. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कटुता संपवा आणि कामाला लागा, असे आवाहन ठाकरे गटाकडून फडणवीस यांना करण्यात आले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र सामनात म्हटले आहे की, “काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!” असे आवाहन शिवसेनेकडून फडणवीस यांना करण्यात आले.
– काय आहे अग्रलेखात ?
शिवसेना राहता कामा नये व शिवसेनेतून जे विष बाहेर पडले. त्या विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार? शिवसेनेतील काही लोक लाचार किंवा मिंधे केल्याने सत्ता मिळाली; पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले? असो. उद्या काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!
महाराष्ट्राचे (उप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन दिवाळीत सामोपचाराच्या, शहाणपणाच्या गोष्टी केल्यात. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. फडणवीस यांचा मूळ स्वभाव हा सामोपचाराने मिळून मिसळून वागण्याचाच होता. पण सत्ता गेल्यामुळे ते बिघडले. सत्ता येते व जाते. माणसाने मूळ स्वभाव बदलण्याची गरज नाही. असा टोमणा शिवसेनेने फडणवीसांना मारला आहे.
-येरागबाळय़ांची मोट बांधणे हा प्रामाणिकपणा नाही
शिवसेना नष्ट करण्यासाठी सर्व येरागबाळय़ांची मोट बांधणे हा काही प्रामाणिकपणा नाही. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास विरोध करणे ही भूमिका इतर कोणी घेतली तर त्यास मान्यता असूच शकत नाही, पण फडणवीस यांच्यासारख्या शहाण्याने तशी भूमिका घेणे महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारे नव्हते. खरी शिवसेना कोणती? हे फडणवीसांना पक्के माहीत आहे व त्यांनी गळय़ात जो ‘खरी शिवसेना’ म्हणून धोंडा बांधून घेतला आहे तो महाराष्ट्राला घेऊन बुडणार आहे, हे समजण्याइतके फडणवीस सुज्ञ आहेत. पण त्यांचे शहाणपण कोठेतरी भरकटल्यासारखे झाले आहे.
-राज्यात कटुता आहे व ती दूर केली पाहिजे
शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचा शब्दच नव्हता हे पक्के ठरले होते ना? मग आता फुटलेल्या ‘मिंधे’ गटास मुख्यमंत्रिपद देऊन ‘‘आम्ही मुख्यमंत्रिपदाचा शब्द पाळला बरं का?’’ अशा चिपळ्या वाजवायचे कारण काय? हेच मुख्यमंत्रिपद आधी दिले असते तर राज्यात कटुता निर्माण झाली नसती व फडणवीस यांनाही खंत वगैरे वाटण्याचा प्रश्नच नव्हता. अर्थात राज्यात कटुता आहे व ती दूर केली पाहिजे हा विचार देवेंद्र फडणवीस यांच्या मनात येणे हे महत्त्वाचे.
-जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही
फडणवीस हे ‘सागर’ बंगल्यावर खूश आहेत. गेल्यावेळी भाजपने शब्द पाळला असता तर तेच आज ‘वर्षा’वर असते व आम्ही एका नात्याने त्यांच्याकडे फराळास गेलो असतो. असो. उद्या काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!!


