लोकसभा, राज्यसभेत हिंडेनबर्गच्या अहवालवरून रणकंदन
-अदानीच्या शेअर्समध्ये 35 टक्क्यांनी घसरण
प्रतिनिधी
नवी दिल्ली : अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या अहवालामुळे संसदेपासून बाजारापर्यंत हल्लकल्लोळ माजला आहे. विरोधकांनी अदानी समूहावरील आरोपांची सखोल चौकशीची मागणी केली आहे. या मुद्यावरून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी संसदेत गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत, तर राज्यसभेचे कामकाज दुपारी 2.30 पर्यंत तहकूब करण्यात आलेत. विरोधकांनी अदानींच्या कथित घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) किंवा सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वातील समितीमार्फत करण्याची मागणी केली आहे.
दुसरीकडे, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये शुक्रवारी सकाळी तब्बल 35 टक्के ची घसरण नोंदविण्यात आली. यामुळे एका शेअरची किंमत 1000 रुपयांजवळ पोहोचली आहे. हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी अदानींचा 1 शेअर जवळपास 3500 वर होता. अशाप्रकारे मागील 9 दिवसांत कंपनीचे शेअर्स 70 टक्केनी घसरले आहेत. या घटनाक्रमानंतर अमेरिकेच्या डाउ जोंस स्टॉक एक्सचेंजने अदानी एंटरप्रायझेसला सस्टेनबिलिटी इंडेक्समधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
बांगलादेश सरकारने अदानी समूहासोबतच्या ऊर्जा क्षेत्रातील सौद्यात दुरुस्तीची मागणी केली आहे. बांगलादेश सरकारच्या मते, अदानींची वीज अत्यंत महागडी आहे. त्यांनी ती स्वस्त केली पाहिजे. काँग्रेसनेही याप्रकरणी 6 फेब्रुवारी देशव्यापी निदर्शनांचा इशारा दिला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसद परिसरात याप्रकरणी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्यात काँग्रेस, टीएमसी, आम आदमी पार्टी, सपा, डीएमके, जनता दल व डाव्यांसह 13 पक्ष सहभागी झाले. काँग्रेस सरचिटमीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, पक्ष कार्यकर्ते या प्रकरणी 6 फेब्रुवारी रोजी देशभरातील जिल्ह्यांतील एलआयसी व एसबीआय कार्यालयांपुढे निदर्शने करतील. शेअर बाजारातील हा अमृतकाळ आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
NSEने अदानी समूहाच्या 3 शेअर्सना अल्पमुदतीसाठी अॅडिश्नल सर्व्हिलांस मेजर्सच्या यादीत टाकले आहे. यात अदानी पोर्ट, अदानी एंटरप्रायझेस व अंबुजा सिमेंटचा समावेश आहे. ASM निगराणीची एक विशेष पद्धत असते. त्या माध्यमातून मार्केटच्या रेग्युलेटर सेबी व मार्केट एक्सचेंज BSE, NSE त्यावर नजर ठेवते. याचे उद्दीष्ट गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करण्याचे असते. एखाद्या शेअरमध्ये चढ-उतार होत असल्यास त्याला NSEमध्ये टाकले जाते. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे मार्केट कॅप 8.38 लाख कोटींनी घसरले आहे. यामुळे गुरूवारी अदानींची फोर्ब्सच्या रिअल टाइम यादीत 17 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.


