रामटेकच्या गडासाठी मोर्चेबांधणी : या पक्षाची तयारी, काहींचे कशातच काही नाही

रामटेकच्या गडासाठी मोर्चेबांधणी : या पक्षाची तयारी, काहींचे कशातच काही नाही

-चालणार तुमानेंची हवा की होईल काँग्रेसचा करिष्मा

गजानन ढाकुलकर
नागपूर : २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. जवळपास एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. राजकीय वर्तुळात हालचालीला वेग आलेला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव आहेत. शिवसेनेचे दोन गट तयार झाल्याने तसेच प्रत्येक राजकीय पक्षात गटबाजी असल्याने येथील जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला येते, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र राजकीय पक्षाच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने रामटेक लोकसभा आमच्या वाट्याला असल्याची डरकाळी मारली आणि तसे पाय रोवणे सुरू केले आहे. वरिष्ठ नेत्यांनी नागपूर आणि रामटेक येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि संमेलने सुरू केले. त्याचबरोबर सेनेची (उद्धव ठाकरे गट) पक्षाच्या बळकटीकरणासाठी मागील महिन्यात रामटेक येथे सुषमा अंधारे यांची जाहीर सभा झाल्याने सेनेत नवचैतन्य फुलले आणि सेनेच्या कार्यकर्त्यामध्ये ताकद संचारली.

भाजपाने मात्र गुप्तचरांच्या माध्यमातून क्षेत्रातील परिस्थिती आणि मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. कॉँग्रेस पक्षातून त्यापद्धतीने कोणत्याही हालचालीचा वेग दिसून येत नसला तरी त्यांनी ‘हात से हात जोडो’, हा उपक्रम राबविल्याने हाही त्यातलाच भाग आहे. हा एक उपक्रम सोडला तर कॉंग्रेस अजूनही ढिम्मच दिसत आहे.

लोकसभेचा सर्वाधिक मोठा मतदारसंघ म्हणजे रामटेक. निवडणुकीच्या काळात याकडे सर्वच राजकीय नेत्यांच्या नजरा लागून असतात. एके काळी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेला रामटेक लोकसभा क्षेत्र. तेराव्या लोकसभेच्या निवडणुकीत १९९९ मध्ये याला खिंडार पडले आणि शिवसेनेचे सुबोध मोहिते निवडून आले. जतिराम बर्वे, पी. व्ही. नरसिंहराव, तेजसिंहराव भोसले, दत्ता मेघे, चित्रलेखा भोसले आदींसह काँग्रेसचे उमेदवार याच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

या क्षेत्रात कॉँग्रेसचा दबदबा होता. पण आता तो काही राहिलेला नाही. भाजप-शिवसेनेची युती असताना रामटेक लोकसभेवर शिवसेनेने बाजी मारली. २००९ साली काँग्रेसचे मुकुल वासनिक याच मतदार संघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ साली मोदी मोदी लाटेत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी रामटेकचा गड काबीज केला.

२०१९ साली शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना संधी दिली. मात्र त्यात काँग्रेसला फारसे यश मिळाले नाही. किशोर गजभिये यांचा एक लाख २६ हजार ७८३ येवढ्या प्रचंड मताधिक्याने पराभव झाला. त्यामुळे येणाऱ्या २०२४च्या निवडणुकीत रामटेक लोकसभेत कॉँग्रेस कोणत्या नेत्याला लढवणार, याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे.