राज्यपाल बदलणार; फडणवीस, कोश्यारी दिल्लीत

राज्यपाल बदलणार; फडणवीस, कोश्यारी दिल्लीत

-महाराष्ट्रभर निदर्शने

प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भोवण्याची शक्यता निर्माण झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भगतसिंह कोश्यारी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठीत कोश्यारींच्या बदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उभ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या ठाकरे गटाने रस्त्यावर उतरून निदर्शने केली. त्याची धग दिल्लीपर्यंत पोहचली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डॉक्टरेटने गौरविण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य करत शिवरायांची तुलना उपस्थित पाहुण्यांशी केली. ते म्हणाले, आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो. तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण. त्यावेळी कुणाला सुभाषचंद्र, कुणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील. शिवाजी महाराज जुन्या काळातला विषय. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले. यावरून वाद सुरू झाला.

हात जोडून पंतप्रधानांना विनंती

कोश्यारींच्या या वक्तव्याचे महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटत आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल असे का बोलतात मला समजत नाही. त्यांना महाराष्ट्राबाहेर पाठवून द्या, अशी हात जोडून पंतप्रधानांना विनंती केली. तसेच महाराष्ट्राचे वैभव धुळीस मिळवणारी व्यक्ती नको आहे. त्यांच्या मनात घाणेरडा विचार येतोच कसा, असा सवाल केलाय.

उदयनराजे भोसले आक्रमक

उदयनराजे भोसले यांनीही कोश्यारींच्या वक्तव्याबद्दल पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार जुना झाला, हे वाक्य राज्यपालांच्या तोंडून ऐकून मी सुन्न झालो. त्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, नितीन गडकरीही होते. त्यांनी महापुरुषांच्या अपमानाबाबत आपल्या भाषणात भूमिका मांडणे आवश्यक होते. राज्यपाल आणि शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे म्हणणाऱ्या सुधांशू त्रिवेदीला पदावरून हटवावे, या मागणीसाठी आपण पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिल्याची माहिती त्यांनी दिली.

-कोश्यारी यांनी मर्यादा ओलांडल्या

उदयनराजे भोसले यांच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कोश्यारींवर टीकास्त्र सोडले. पवार म्हणाले, राज्यपाल ही एक संस्था असून त्याची प्रतिष्ठा ठेवायची म्हणून आतापर्यंत कुणी बोलले नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी केलेला उल्लेख पाहिल्यानंतर कोश्यारी यांनी मर्यादा ओलांडल्या असून त्यांचा निकाल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

-महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र यावे

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ज्यांना वृद्धाश्रमातसुद्धा कुणी घेणार नाही, अशांची राज्यपालपदी नियुक्ती होते आहे. मी राज्यपालपदाचा आदर करतो, परंतु कोश्यारींचा नाही. आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारींनी अपमान केला. अवहेलना केली. आता हे पार्सल परत पाठवण्याची वेळ आली आहे. याविरोधात महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

-अजूनही वाद शमताना दिसत नाही

महाराष्ट्रात राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने आंदोलन केले. अजूनही वाद शमताना दिसत नाही. या असंतोषाची धग थेट दिल्लीपर्यंत पोहचलीय. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे आजच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुद्धा दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज्यपालांच्या बदलाबाबत शक्यता होण्याची चर्चाय. वाढता असंतोष पाहता कोश्यारींना हटवण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येतेय.