या शिवसेनेच्या नेत्यासाठी शिंदे गटाचे दरवाजे बंद !
-मंत्री शंभुराज देसाई यांनी उडविली नार्वेकरांची खिल्ली
प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या भाजप वा शिंदे गटात जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, शिंदे गटाने नार्वेकरांसाठी दरवाजे बंद केल्याची चर्चा आहे.
एका जाहीरातीत नार्वेकर यांनी धनुष्यबाण चिन्ह घातलेले टी शर्ट घातल्याने शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी नार्वेकरांची खिल्ली उडवली आहे. पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले असेल, तर ते परत वापरता येत नाही. मात्र जुनी जाहिरात रिपीट झाली असेल, असा टोला शंभुराज देसाईंनी नार्वेकरांना लगावला.
-धनुष्यबाणाचा लोगो टीशर्टची चर्चा
मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्याबद्दल नार्वेकरांचे अभिनंदन करणारी जाहीरात स्थानिक वृत्तपत्रात त्यांच्या समर्थकांनी दिली आहे. त्यामध्ये नार्वेकरांचा धनुष्यबाणाचा लोगो असलेला जुना टीशर्ट घातलेला फोटो छापण्यात आला. मात्र, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यापासून ठाकरे गटाकडून मशाल चिन्हाचाच जोरदार प्रचार केला जात आहे. त्यामुळे नार्वेकर यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिरातीत शिवसेनेचा धनुष्यबाण झळकल्याने चर्चेला तोंड फुटले आहे.
-शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
नार्वेकरांच्या या जाहीरातीवरच शिंदे गटाचे नेते व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी टीका केली आहे. त्यामुळे शिंदे गटाने नार्वेकरांसाठी दरवाजे बंद केल्याचे बोलले जात आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून ‘मशाली’चा जोरदार प्रचार असताना मिलिंद नार्वेकरांच्या टी-शर्टवरील धनुष्यबाण पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेणारा आहे का, असा प्रश्नही आता विचारला जात आहे. अशातच शिंदे गटातील नेत्यांनीही नार्वेकरांवर टीका केल्याने नार्वेकर शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
-भाजप प्रवेशाबाबत महाजन म्हणतात
नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भाजप प्रवेशाच्या चर्चांना तोंड फोडले. त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनीही राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते, असे सूचक वक्तव्य केले होते. गिरीश महाजन म्हणाले होते की, मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचे मी ऐकतो आहे. नार्वेकर यांचे अमित भाईंशी संबंध चांगले आहेत. आता शिवसेनेत कोण राहील आणि कोण जाईल हे सांगता येत नाही.


