या बड्या नेत्याची मध्यस्थी; चंद्रकांत पाटील शाईफेकी प्रकरण

या बड्या नेत्याची मध्यस्थी; चंद्रकांत पाटील शाईफेकी प्रकरण
-म्हणाले, पोलीस व उतारावरील कलमे रद्धची विनंती

प्रतिनिधी
मुंबई : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाईफेकीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आपण मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि खुद्द चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून यशस्वी मध्यस्ती केली, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांवर करण्यात आलेली कारवाई अनाठायी असून त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी अशी विनंती केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबन मागे घेतल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यावर लावलेली कलमे पाहता त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे ते ठरेल असे, म्हणून ती कलमे रद्द करावीत अशी माझी विनंतीही मान्य करण्यात आली आणि माझी मध्यस्ती यशस्वी झाल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

– मतं मिळवण्याची केविलवाणी धडपड

राज ठाकरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली तर निषेध व्हायलाच हवा, आम्ही पण ‘मनसे स्टाइल’ने अनेकवेळा निषेध नोंदवतो. पण हे करताना काही संकेत असतात. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून विधानं करून माथी भडकवण्याचे उद्योग सुरु आहेत आणि त्या वादांमधून मतं मिळवण्याची केविलवाणी धडपड सुरु आहे. त्यामुळे एखादं विधान आलं की त्याचे संदर्भ न तपासता कार्यकर्त्यांना भडकवून, स्वतः नामानिराळं राहण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढायला लागलेत. मग ह्यांचे कार्यकर्ते पण कसलाच विचार न करता, कसलीही खातरजमा न करता, वाट्टेल त्या मार्गाने निषेध करत सुटतात.’

असाच प्रकार, राज्यातील विद्यमान मंत्री, भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र चंद्रकांत पाटील ह्यांच्या बाबतीत घडला. एका कार्यक्रमात त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली. एक बरं झालं, की चंद्रकांत दादांच्या डोळ्याला कोणतीही इजा झाली नाही. हे झाल्यावर पोलीस आयुक्तांनी तिथे हजर असलेल्या ११ पोलिसांचं निलंबन केलं आणि आरोपींवर भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत अनेक कलमांच्या जोडीला, कलम ३०७ देखील लावलं. हे कलम सदोष मनुष्यवधाचं कलम आहे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

-काय सुचविले राज ठाकरे यांनी ?

राज ठाकरे पुढे म्हणतात की, ‘हे सगळं जेंव्हा मला कळलं तेंव्हा मला सर्वप्रथम हळहळ वाटली ती माझ्या पोलीस बांधवांबद्दल. पोलिसांना हा प्रकार रोखता आला नाही हे मान्य, पण तरीही त्यांच्यावरची कारवाई मला तरी अनाठायी वाटली आणि त्यामुळे मी अस्वस्थ होतो. त्यातच आज संध्याकाळी पिंपरी चिंचवड परिसरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि इतर काही नागरी संस्थांचे पदाधिकारी मला भेटून गेले आणि त्यांनी पोलिसांनी दाखल केलेली कलमं ही गंभीर आहेत अशी तक्रार केली. मुळात एखाद्याच्या जीवावर बेतेल अशा पद्धतीने निषेध नोंदवणं हे साफ बिनडोकपणाचं आहे, आणि माझ्या मते हा निषेध नाही तर तो स्टंट असतो. ह्याची जाणीव मी त्या प्रतिनिधींना करून दिली. पण असो, निषेधकर्त्यांच्या वतीने ह्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मला विनंती केली की, मी ह्या प्रकरणात मध्यस्थी करावी, कारण ही कलमं कायम राहिली तर ह्या कार्यकर्त्यांचं आयुष्य उध्वस्त होईल.’