या प्रदेशाध्यक्षाने सोडली उद्धव ठाकरे यांची साथ

या प्रदेशाध्यक्षाने सोडली उद्धव ठाकरे यांची साथ
-स्वीकारले एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व
प्रतिनिधी
त्रिपुरा : शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का बसला आहे. त्रिपुरा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र प्रसाद यांनी ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी त्यांची त्रिपुरा राज्यप्रमुखपदी निवड केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यभरातील अनेक शिवसैनिक साथ सोडत आहेत. त्यातच आता राष्ट्रीय स्तरावरदेखील त्यांना हादरे बसण्यास सुरूवात झाली आहे. त्रिपुरा राज्यप्रमुख देवेंद्र प्रसाद यांनी ठाकरे गटाकडून पदाचा राजीनामा देत, एकनाथ शिंदे यांचा हाति पकडला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरेंची साथ अनेकांनी सोडली आहे. आज मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंची सभा असताना नाशिक उपमहानगरप्रमुख शशिकांत कोठुळे यांच्यासह माजी नगरसेविका श्यामला हेमंत दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, प्रभाकर पाळदे यांच्यासह शरद देवरे, शोभा गटकाळ, मंगला भास्कर, शोभा मगर, अनिता पाटील, ज्योती देवरे, आशा पाटील, सीमा पाटील आशा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, शहराच्या मुस्लिमबहूल पूर्व भागात उर्दू भाषेतदेखील स्वागताचे बॅनर झळकले असून त्यावर ‘जनाब उद्धव ठाकरे’ असा उल्लेख असल्याने बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे मालेगावात येत आहेत. शिवसेना उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे यांनी मालेगावात सभा घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या सभेची जोरदार तयारी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.