या नेत्याचे टि्विट: अजित पवार भावी मुख्यमंत्री
-राज्यात पुन्हा नव्या भूकंपाची चर्चा
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज शनिवारी 64 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने लावण्यात आलेल्या काही बॅनर्सवर त्यांच्या नावाचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला आहे. या बॅनर्सवरून राज्यात खमंग चर्चा होत असताना आता अजित पवारांचे विश्वासू आमदार अमोल मिटकरी यांनी यासंबंधी केलेल्या एका ट्विटमुळे या चर्चेला नव्याने फोडणी मिळाली आहे.
–अमोल मिटकरी म्हणतात
अमोल मिटकरी यांनी एका ट्विटद्वारे अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व, असे लिहिले आहे. या ट्विटद्वारे त्यांनी अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असे सूचवले आहे. त्यामुळे त्यांचे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.
मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडिओही जोडला आहे. त्यात अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची घेतल्या शपथेचा काही भाग, मुलाखती व भाषणांतील विधाने दाखवण्यात आले आहे.
–संजय राऊत यांचा दावा
उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारीच अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिवस भरल्याचेही विधान केले होते. अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेत म्हणजे ते फार दिवस भावी राहणार नाहीत, असे राऊत म्हणाले होते.
– लवकरच मुख्यमंत्री पदाची माळ अजित पवारांच्या गळ्यात
मलाही राजकारण माहिती आहे. कुठे काय घडामोडी घडत आहेत ते मलाही माहिती आहे. मग त्या घडामोडी कायदेशीर असतील, घटनात्मक असतील किंवा राजकीय असतील. पण अजित पवार हे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत. त्यांचे हे भविष्य लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील यात शंका नाही. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याचे मी यापूर्वीच सांगितले आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले होते.


