मोदी आडनाव : राहुल गांधी यांच्यावर तिसऱ्यांदा ‘सर्वोच्च’ सुनावणी

मोदी आडनाव : राहुल गांधी यांच्यावर तिसऱ्यांदा ‘सर्वोच्च’ सुनावणी

– सर्वोच्च न्यायालायच्या निकालाकडे लक्ष

प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 23 मार्च रोजी गुजरातच्या सत्र न्यायालयाने राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे राहुल यांची खासदारकी गेली होती.

त्यानंतर राहुल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. ७ जुलै रोजी गुजरात उच्च न्यायालयाने आपल्या निकालाjत दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली. अखेर 15 जुलै रोजी राहुल यांनी शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

सुप्रीम कोर्टात दोनदा सुनावणी

21 जुलै : सर्वोच्च न्यायालयात 15 जुलै रोजी याचिका दाखल केल्यानंतर न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने 21 जुलै रोजी या प्रकरणावर पहिली सुनावणी घेतली. सुनावणी सुरू करण्यापूर्वी न्यायमूर्ती गवई म्हणाले की, त्यांचे वडील काँग्रेसशी संबंधित होते आणि त्यांचा भाऊही काँग्रेसशी संबंधित होता. अशा स्थितीत त्याच्या सुनावणीला कोणत्याही पक्षकाराची हरकत नाही. यावर दोन्ही पक्षांनी आपली कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले.

राहुल गांधी संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नाहीत आणि पावसाळी अधिवेशनही सुरू आहे, असे राहुल यांचे वकील अभिषेक सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितले. वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूकही लवकरच जाहीर होऊ शकते. अशा वेळी या प्रकरणाची सुनावणी लवकर व्हावी.

सिंघवी यांनी राहुल यांना अंतरिम दिलासा देण्याची मागणीही केली. त्यावर न्यायालयाने सांगितले की, दुसरी बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम दिलासा देऊ शकत नाही.

2 ऑगस्ट : 2 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा सुनावणी झाली. पहिल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही पक्षांना जबाब नोंदवण्यास सांगितले होते. मोदी आडनाव प्रकरणात राहुल यांची वृत्ती अहंकारी असल्याचे पूर्णेश मोदी यांनी 21 पानी प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले. त्यांची याचिका फेटाळण्यात यावी.

राहुल यांनी न्यायालयात जबाब नोंदवला असून कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर झाल्याचे सांगितले. माफी मागण्यास नकार दिल्याने मला अहंकारी म्हटले गेले, हे निषेधार्ह आहे.