मोठी अपडेट: अंधेरी पोटनिवडणुकीचे भाजपवर फुटणार खापर

मोठी अपडेट: अंधेरी पोटनिवडणुकीचे भाजपवर फुटणार खापर

-ऋतुजा लटकेंना 42 हजार मते

– नोटावरून शिवसेना आक्रमक होण्याची चिन्हे

प्रतिनिधी
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या सध्या विजयाच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. अंधेरीत रविवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंत मतमोजणीच्या एकूण अकरा फेऱ्या पार पडल्या असून यामध्ये ऋतुजा लटके यांना ४२ हजार ३४३ मते मिळालीत. तर या निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या नोटा या पर्यायाला ८ हजार ३७९ मते मिळाली आहेत. त्यामुळे एका बाजूला ऋतुजा लटके यांच्या यशाचे ढोल बडवले जात असले तरी नोटा फॅक्टरही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या बाबीचे शिवसेना ठाकरे गट मनावर घेण्याची शक्यता आहे. भाजपावर खापर फोडून येत्या मुंबई मनपा निवडणुकीत धारेवर  धरून पुन्हा सहानुभूती मिळविण्याची श्यकता आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून ऋतुजा लटकेविरुद्ध नोटा अशी लढाई पाहायला मिळत आहे. नोटा फॅक्टरने ऋतुजा लटके यांना एकदाही आव्हान दिले नसले तरी आतापर्यंत पडलेली ८ हजार ३७९ मते ही लक्षणीय मानली जात आहेत.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधी मतदारसंघात नोटाला मतदान करा, असा प्रचार सुरू झाला होता. या प्रचाराचे परिणाम आजच्या निकालात पाहायला मिळत आहेत. कारण, आतापर्यंत आकडेवारीनुसार, अकराव्या फेरीअखेर नोटाला ८३७९ मते मिळाली आहेत. सर्व अपक्ष उमेदवारांना बाजुला सारत नोटाने दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली आहेत.

ठाकरे गटाने अंधेरीत नोटाचा पद्धतशीरपणे प्रचार सुरू असल्याचा आरोप केला होता. यामागे भाजपची फूस असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते. आज नोटाला पडलेली मतं पाहता हा प्रचार काहीप्रमाणात यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एकतर मतदारांपुढे ऋतुजा लटके यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही तुल्यबळ उमेदवाराचा पर्याय नव्हता. त्यामुळे मतदारांनी नोटाला मतदान केल्याची शक्यता आहे. पण अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वी सोशल मीडियावर नोटाला ऋतुजा लटके यांच्यापेक्षा जास्त म्हणजे साधारण ४३ हजार मतं मिळतील, असा दावा करणारा एक सर्व्हे व्हायरल झाला होता. परंतु, आजचा निकाल पाहता हा दावा सपशेल फोल ठरला आहे.