ममतांना शह;पंचायत निवडणुकांत विरोधकांची मोर्चेबांधणी

ममतांना शह;पंचायत निवडणुकांत विरोधकांची मोर्चेबांधणी

-एप्रिल २०२३ मध्ये पंचायत निवडणुका

प्रतिनिधी
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये एप्रिल २०२३ मध्ये पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वीच येथे हिंसाचारही सुरू झाला आहे. शहर-ग्रामीण भागात राजकीय पक्षांची पकड किती मजबूत आहे हे याच रक्तरंजित निवडणुकांमधून प्रत्ययास येते. कारण राज्यात सुमारे ५९ हजार पंचायत सदस्यांच्या पदांसाठी पक्ष चिन्हावर निवडणूक होते. सन २०१८ मध्ये पंचायत निवडणूक हिंसाचारात २० बळी गेले होते. तथापि, ३० पेक्षा अधिक मृत्यू झाल्याचा दावा केला जातो. यंदाची निवडणूकही नेहमीपेक्षा अधिक रक्तरंजित होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

प्रत्येक पंचायतीला दरवर्षी ४-५ कोटी रुपयांचा निधी मिळतो आहे. ‘दैनिक भास्कर’ने कोलकाता, पूर्व मेदिनापूर, हावडा, उत्तर २४ परगणा आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांमधील परिस्थिती जाणून घेतली. ममता बॅनर्जींच्या तृणमूलला रोखण्यासाठी ग्रामीण बंगालमध्ये अनेक भागांत ‘एकास एक’(वन टू वन) उमेदवार देण्यासाठी भाजपला माकप आणि काँग्रेस समर्थकांची साथ मिळण्याचे नवे समीकरण तयार होत आहे.

उत्तर २४ परगणा, पूर्व मेदिनीपूरसह काही जिल्ह्यांमध्ये ‘पहले राम…फिर वाम’(आधी राम, मग डावे पक्ष) हा नारा दिला जातोय, तर काही ठिकाणी तृणमूलविरोधात मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याचा नमुना नुकत्याच झालेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांत प्रत्ययास आला. तृणमूलचा पाडाव करण्यासाठी अनेक ठिकाणी डावे पक्ष आणि काँग्रेसने उमेदवारच दिले नाहीत. भाजप, माकप अथवा काँग्रेसचे नेते हे मान्य करीत नाही, परंतु प्रत्यक्ष आकडेवारीत तेच चित्र दिसते. तृणमूलचे पदाधिकारी स्वदेश दास यांच्या मते, अनेक ठिकाणी भाजप-डावे अथवा भाजप-काँग्रेस यांचे साटेलोटे आहे. पूर्व मेदिनापूरमध्ये नंदकुमार-बेहरामपूर सहकारी कृषी पतसंस्थेच्या निवडणुकीत भाजप-माकप समर्थकांनी एकत्र निवडणूक लढवून सर्वच्या सर्व ६३ जागा जिंकल्या. नव्या आघाडीचा धसका घेऊन यापैकी ५२ जागांवर तृणमूलने उमेदवारीच मागे घेतली. या निवडणुकीतील विजेते दुलाल मंडल म्हणाले, २०११ मध्ये डाव्यांचा पाडाव करताना तृणमूलनेही अनेक पक्षांना सोबत घेतले होते. आता आम्ही नवी समीकरणे तयार करू शकतो. महिषादल सहकारी सोसायटीतही ८३ पैकी ७३ जागा भाजपने जिंकल्या आहेत. या जुगलबंदीवर कोलकात्याचे प्रा. सुमन नाथ म्हणाले, सर्वच ठिकाणी असे घडले नाही, परंतु तृणमूल समर्थकांनी ज्या ठिकाणी जास्त हिंसाचार घडवला त्या ठिकाणी नवी समीकरणे आकारास येऊ शकतात.

इथे ‘लुंगीवाहिनी’ चालणार नाही

सत्तारूढ असूनही तृणमूल समर्थक भयभीत झाले असे एकमेव ठिकाण म्हणजे नंदीग्राम. शुभेंदू अधिकारी यांनी इथे ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. गोकुळनगरचे तृणमूल कार्यकर्ते सुब्रतकुमार (३८) यांनी सांगितले, १५ डिसेंबर रोजी माझ्या घरावर ३ बॉम्ब फेकण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवला आहे. गोकुळपुरी भागात केवळ हिंदूंचीच दुकाने आहेत. एका मुस्लिम व्यक्तीने बाइक शोरूम उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला प्रचंड विरोध झाल्याने अखेरीस एका हिंदूलाच भूखंड विकून तो निघून गेला,असा किस्सा चहा विक्रेते संजय यांनी सांगितला. इथे ‘लुंगीवाहिनी’ चालणार नाही, असे लोक खुलेआम म्हणतात.

जातीयवादी मुद्द्यांना फूस

उत्तर २४ परगणामध्ये जाणाऱ्या कल्याणी एक्स्प्रेसवेच्या दुतर्फा तृणमूलचे झेंडे आणि ममतांचे भाचे अभिषेक यांचे पोस्टर दिसून येतात. अनेक गावांचा दौरा केल्यानंतर कळाले की, गेल्या पंचायत निवडणुकांमध्ये अनेकांना धमक्या देऊन उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले. मतदान करू दिले नाही. हालीशहर रेल्वेस्थानकानजीक जिमचे मालक भाजप कार्यकर्ते मानष पांडेय म्हणतात, यावेळी गटागटाने उमेदवारी भरू. त्यांनी बॉम्ब फेकले तर जशास तसे उत्तर देऊ. आम्ही मरू अथवा मारू. दक्षिण २४ परगणातील कुलतुली गटातील प्राथमिक शिक्षक चंदन दास यांनी सांगितले, ‘रात्री धमाके ऐकू येऊ लागले आहेत. जातीयवादी मुद्द्यांना फूस लावली जात आहे.

क्लबमधून राजकीय हेरगिरी
१५-२० वर्षांपूर्वी क्लब हे क्रीडा-सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र होते. तृणमूलच्या राज्यात त्यात धार्मिक उपक्रम अन् निधी वाढला.एका क्लबला १-२ लाख रुपये मिळतात.त्यामुळे धडाधड नवे क्लब तयार झाले. काही ब्लॉकमध्ये तर सव्वाशे क्लब आहेत.याचे काही सदस्य राजकीय हेरगिरी करतात. या नेटवर्कच्या माध्यमातून तृणमूल आपली संघटनात्मक बांधणी मजबूत करीत आहे.कोलकाता विमानतळानजीक विराट या भागातील एक रहिवासी म्हणाले, क्लबचे जमीन -फ्लॅटचे व्यवहार करताना सिंडिकेटला खंडणी द्यावी लागते. घर बांधकामाचे साहित्यही याच सिंडिकेटमार्फत खरेदी करावे लागते. हेच क्लब तरुणांसाठी उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.