भाजपाच्या होम ग्राऊंडवर काँग्रेसने ठोकला शड्डू
-सहाही विधानसभा मतदारसंघांत मुख्य समन्वयकांची नियुक्ती
प्रतिनिधी
नागपूर : विदर्भातील कॉंग्रेसचा एक चांगला चेहरा म्हणजे आशिष देशमुख. त्यांनी नुकताच कॉंग्रेसला रामराम ठोकत थेट भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेस अधिक सक्रीय झाले आहे. आगामी निवडणुकीसाठी संघटन बांधणींतर्गत काँग्रेसने नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांत मुख्य समन्वयकांची नियुक्ती केली. त्यामुळे भाजपच्या होम ग्राऊंडवर कॉंग्रेस पुन्हा त्यांना तगडे आव्हान देणार हे निश्चित झाले आहे.
कॉंग्रेसने लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन समन्वयांची घोषणा केली. विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वयक म्हणून राजेश डेंगे (पूर्व), संजय सरायकर (पश्चिम), विवेक निकोसे (उत्तर), प्रशांत धवड (दक्षिण), पुरुषोत्तम पारमोरे (दक्षिण-पश्चिम) आणि रमण पैगवार (मध्य) यांची नियुक्ती करण्यात आली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांच्या समन्वयकांची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघ आणि 288 विधानसभा मतदारसंघांसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी यादी जाहीर केली होती.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या निर्णयांनंतर भाजपने कामाला सुरुवात केली होती. दुसरीकडे आशिष देशमुख यांनी कॉंग्रेसशी फारकत घेत भाजपमध्ये जंगी प्रवेश केला. त्यामुळे आता काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहरातील सहा मतदारसंघांसाठी समन्वयक जाहीर करुन भाजपला होम ग्राऊंडवर रोखण्यासाठी प्लॅन आखल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे.
काँग्रेसला गेल्या काही निवडणुकांमध्ये विदर्भात मोठे यश मिळालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ताकद लावली जात आहे. नागपूर शहरातील सहा मतदारसंघांमध्ये काँग्रेसनं समन्वयक नियुक्त केले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा येत्या निवडणूकांमध्ये किती होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


