भाजपाच्या निरीक्षकांसमोर कार्यकर्त्यांची मागणी : यांना द्या नागपूरची उमेदवारी

भाजपाच्या निरीक्षकांसमोर कार्यकर्त्यांची मागणी : यांना द्या नागपूरची उमेदवारी

-शहरातील ७० प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद

प्रतिनिधी
नागपूर : लोकसभा निवडणूकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच नागपूरचे उमेदवार हवे आहेत, अशी स्पष्ट भूमिका भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या निरीक्षकांसमोर मांडली.

गुरुवारी पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक खासदार मनोज कोटक व माजी खासदार अमर साबळे हे नागपुरात आले होते. त्यांनी नागपुरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून त्यांची भूमिका जाणून घेतली.

एकीकडे भाजपकडून जास्त जागा लढण्याची तयारी असल्याच्या चर्चा सुरू असताना मागील वेळी जिंकलेल्या २३ जागांसाठी पक्षाने निरीक्षक नेमले. संबंधित मतदारसंघात जाऊन तेथील पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून आढावा घेण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर देण्यात आली आहे. याच प्रक्रियेत कोटक व साबळे नागपुरात आले होते. गुरुवारी दुपारी भाजप कार्यालयात शहरातील ७० प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते. भाजयुमोच्या महासंमेलनासाठी व्यस्त असल्याने ५५ पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. सुरुवातीच्या नियोजनानुसार निरीक्षक प्रत्येकाकडून एक फॉर्म भरून घेणार होते व त्यात कुणाला उमेदवारी दिलेली जास्त संयुक्तिक ठरेल अशी विचारणा होणार होती. त्यानंतर प्रत्यक्ष संवाद साधण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला आमदार, माजी आमदार, माजी खासदार, विधानसभा क्षेत्रप्रमुख, निवडणूक प्रमुख, प्रदेश महामंत्री इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.