बीआरएसच्या गळाला स्वाभिमानीचे हे बडे नेते
-राजू शेट्टी यांची चिंता वाढली
प्रतिनिधी
अकोला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अंतर्गत धूसफूस सुरु आहे. यात भारत राष्ट्र समितीने आणखी भर टाकली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची चिंता वाढली आहे.
शेतकरी चळवळीच केंद्रस्थान असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात भारत राष्ट्र समितीने पक्ष बांधणी सुरू केली आहे. शेतकरी चळवळीत असलेले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भारत राष्ट्र समितीकडे वळत असल्याने त्याचा फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बसणार आहे.
भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरवात केली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. सर्वच पक्षांबद्दल अविश्वासाच वातावरण आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते पर्याय शोधत आहेत. अशातच भारत राष्ट्र समितीने गावोगाव पक्ष बांधणी सुरू केली आहे. शेतकरी चळवळीतील अनेक नेते भारत राष्ट्र समितीच्या गळाला लागत आहेत.
सांगली जिल्ह्यातील शेतकरी नेते रघुनादादा पाटील यांनीही भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. भारत राष्ट्र समितीची शेतकऱ्यांबाबत असलेली धोरण आणि प्रचार यंत्रणेला देत असलेलं पाठबळ यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत हा पक्ष गावागावात पोहचणार असे चित्र आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी पुन्हा एकदा लढणार आहेत. या मतदारसंघातील शेतकरी मोठ्या संख्येने स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर आहेत.
आता भारत राष्ट्र समितीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार उतरवल्यास शेतकरी चळवळीत असलेल्या मतांची विभागणी होईल त्याचा फटका सहाजिकच राजू शेट्टी यांना बसेल. त्यामुळे भारत राष्ट्र समितीचा उमेदवार जिंकेल, असा आशावाद केला जात नाही, मात्र मतांच्या विभागणीचा फटका बसला तर राजू शेट्टी अडचणीत येतील असे राजकीय विश्लेषकांना वाटते.


