बावनकुळे स्पष्टच बोलले : संभाजी भिडे यांचा भाजपाशी संबंध नाही

बावनकुळे स्पष्टच बोलले : संभाजी भिडे यांचा भाजपाशी संबंध नाही

-ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असल्याचा दिला दाखला

प्रतिनिधी
नागपूर : संभाजी भिडे हे भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्य देखील नाहीत.ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे त्यांचा भारतीय जनता पक्षाशी संबंध जोडणे योग्य होणार नाही त्यांच्या विधानाची राज्य सरकारने चौकशी करावी.असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. शनिवार, दि. 29 रोजी परभणी येथे ते बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, विरोधी पक्षात संशयाचे व संभ्रमाचे वातावरण आहे त्यामुळे त्यांच्याकडून कुठले विधायक काम केले जात नाही, विरोधी पक्षांनी प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून न्यायालयात खटला दाखल केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. आम्ही केव्हाही निवडणुकीला तयार आहोत.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संभाजी भिडे वेगळे व्यक्तिमत्व आहे, त्यांचा भाजपशी संबंध जोडणे योग्य नाही. पटोले यांनी सांभाळून बोलले पाहिजे.येणाऱ्या काळात भारताला सर्वोत्तम देश करण्याचा मोदीजींचा प्रयत्न आहे. राज्यातील महायुतीचे सरकार चांगले काम करत असल्याचा दावा करतांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीचे राज्यातील निवडून आलेले खासदार मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हात वर करून मतदान करतील, असा विश्वास देखील बावनकुळे यांनी व्यक्त केला.

राष्ट्राच्या कल्याणाकरता शरद पवार आपला विचार बदलतील अशी मला आशा आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीला किमान 45 जागा मिळतील विश्वास व्यक्त केला. पक्षात कुणीही नाराज नाही. सर्व जिल्हाध्यक्षांच्या निवडी योग्य आहेत. आगामी काळात आम्ही इतर इच्छुकांना देखील जबाबदाऱ्या देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमधील सहभागाबद्दल विचारले असता, राजकारणाच्या शेवटी सगळेजण देशाचा विचार करतात आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असणारे सगळेच आमच्या सोबत येतील, असे सांगत बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे समर्थन केले.