बावनकुळेनी स्पष्टच सांगितले; काळजी करू नका! तुमचे 20-25 येईल

बावनकुळेनी स्पष्टच सांगितले; काळजी करू नका! तुमचे 20-25 येईल

– अविश्वास ठरावावरून बावनकुळे यांचे वक्तव्य

प्रतिनिधी
नागपूर : आज महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावर प्रतिक्रिया देताना कशाला नामुष्की करून घेता, तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहे, अशी विरोधी पक्षावर खोचक टीका केली.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अविश्वास ठराव आणण्याचा प्रकार म्हणजे फुसकी बॉम्ब आहे. हा फुसकी बॉम्ब सोडू नये, असे बावनकुळे म्हणाले. या अधिवेशनात विरोधीपक्ष हा फुटकळ-फुटकळ होता. ते काय विकासाचं बोलले? त्यांनी आपली भूमिका योग्यपणे मांडली का? विदर्भ-मराठवाड्याला विकासासाठी सरकारकडून काय काढून घेता येईल, यासाठी त्यांनी बाजू मांडली का? शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठा देण्याबाबत ते कधी भांडले का, मिहानबद्दल भांडले का? असा सवाल करीत विरोधकांनी ९० टक्के भावनात्मक पद्धतीने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप बावनकुळेंनी केला.

विरोधकांचा कारभार दुटप्पी आहे, सभागृह काय विधानपरिषदेतही त्यांच्यात एकमत नाही. या सरकारने योग्य काम केले. विदर्भ-मराठवाड्याला न्याय देण्याच्या घोषणा केल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अडीच वर्ष धानाला बोनस मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी १२ तास वीजपुरवठ्याबाबत अजित पवार यांच्यापुढे नाक रगडले. परंतु, काहीच मिळाले नाही. शेवटी या सरकारने विरोधकांनी मागणी न करताही स्वत:हून धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व इतरही सर्व घटकांना न्याय दिला, असेही बावनकुळे म्हणाले.