बच्चू कडू नवनीत राणांच्या उमेदवारीवरून थेट म्हणाले
-प्रहारचा अमरावती लोकसभेवर दावा
प्रतिनिधी
नागपूर : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच युतीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या प्रहारने लोकसभेसाठी काही जागांवर दावा केला आहे. यात अमरावती या लोकसभा मतदारसंघावर प्रहारने दावा केला आहे.
अमरावतीची जागा आम्ही मागणार आहोत, असे प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी म्हटले आहे. अमरावतीमधून नवनीत राणा या खासदार आहेत. अशातही तुम्ही अमरावतीच्या जागेवर दावा करणार आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नवनीत राणा यांनी आमच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, असं बच्चू कडू म्हणालेत.
अमरावतीची लोकसभेची जागा आम्हाला हवी आहे. हवं तर खासदार नवनीत राणा यांना प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढवू. नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार म्हणून प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा लढवू. अकोला, अमरावतीसह लोकसभेच्या तीन जागा आम्हाला हव्या आहेत, असं बच्चू कडू म्हणाले. आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.महायुतीच्या आजच्या पत्रकार परिषदेबाबत माहिती नाही, असे ते म्हणाले.
लोकसभेपाठोपाठच विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रात होणार आहे. विधानसभेला किती जागांवर उमेदवार देणार? असा प्रश्न विचारला असता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. विधानसभेच्या 15 जागा आम्हाला लढवायच्या आहेत. 15 तारखेनंतर मिटिंग घेऊन भूमिका मांडू. जिथे आमचा उमेदवार खंबीर असेल. चांगला उमेदवार तिथे आम्ही लढू, असं बच्चू कडू म्हणाले. मी श्रीरामाचं दर्शन करुन आलोय. पुन्हा वाटलं तर पुन्हा दर्शनाला जाऊ, असंही त्यांनी सांगितलं.


