फडणवीसांच्या विदर्भात फडणवीस, शिंदे, सत्तार, गवळींना धुतले
-उद्धव ठाकरे यांचा भाषणातून प्रहार
प्रतिनिधी
चिखली(बुलढाणा): कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, अक्कलकोटवर हक्क सांगितला. तुम्ही पंढरपूरचा विठोबा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थही पळवणार का, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.
ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली येथे आज सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर आयात पक्ष म्हणून जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर प्रखर शब्दांत टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या छत्रपतींचा अपमान करायचा. महाराष्ट्रत येणारे उद्योगधंदे गुजरातच्या निवडणुकीसाठी गुजरातमध्ये वळवले. कारण गुजरातच्या निवडणुका जिंकायच्यात. कालसुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंबलले. त्यांनी सोलापूर, अक्कलकोटवर हक्क सांगितला. भीती याची वाटते. जसे उद्योग गुजरातला नेले, तसे महाराष्ट्राचे तुकडे करायला हे मागे पुढे पाहणार नाहीत. का? कर्नाटकच्या निवडणुका. आपले मिंदे मुख्यमंत्री शेपूट घालून बसतील. ठाकरे पुढे म्हणाले की, इकडचे उद्योगधंदे तिकडे न्यायचे. त्यामुळे महाराष्ट्र कंगाल होईल, बेकारी वाढेल. आपली गावे तोडून महाराष्ट्र त्यांच्या घशात घालायचाय. सोलापूर तिकडे गेल्यानंतर पंढरपूरचा विठोबा तिकडे जाणार. हा पंढरपूरचा विठोबा तिकडे गेला, तर शतकानुशतके चालत आलेली परंपरा. ती काय कर्नाटकात टोल भरून जाणार. तुम्ही अक्कलकोटचे स्वामी समर्थ पळवणार का, असा सवालही त्यांनी केला.
-संविधान सुरक्षित नाही
उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी मातीमधली गद्दारी गाडायची असेल, तर जिजाऊंचे आशीर्वाद घेऊनच पुढे निघाले पाहिजे. आज शहीद दिन, संविधान दिन आहे. नेमके काय बोलायचे हा प्रश्नय. शुभेच्छा द्यायचे म्हटले, तरी संविधान आज सुरक्षित आहे का? चार पाच दिवसांपूर्वी मी आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर होतो. त्यांनी प्रश्न विचारला होता, आपल्याला हुकूमशाही हवी की लोकशाही हा महत्त्वाचा प्रश्न.
-त्यांचे आका दिल्लीत
ठाकरे पुढे म्हणाले की, काही जण ४० रेडे घेऊन गुवाहटीला गेलेत. हे त्यांच्याच मंत्र्याने म्हटले आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवतीर्थावर शपथ घेतली. त्यानंतर कुलदैवत एकवीरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर अयोध्येला गेलो. हे आज नवस फेडायला गेले. गेल्या आठवड्यात हात दाखवायला. ज्याला स्वतःचे भविष्य माहिती नाही. तुमचे भविष्य ठरवणारे मायबाप दिल्लीत बसलेत. त्यांनी उठ म्हटले की उठता, बस म्हटले की बसता.
-शिवसैनिक पेटत्या मशाली
उद्धव म्हणाले की, मी बुलढाण्यात आल्यानंतर काही जुने चेहरे दिसत नाहीत. ते फसवे होते. गद्दार निघाले. त्यांना वाटले बुलढाणा माझी मालमत्ता. मात्र, हे मर्द मावळे, या धगधगत्या पेटत्या मशाली आहेत. अन्याय जाळायला निघालेल्या. आमचे सरकार पाडले. पाडायची पद्धत कशी? नितीन देशमुख येऊन भेटले. त्यांना घेऊन गेले होते, पण त्यांनी सांगितले, तुम्ही कापला तरी सोबत येणार नाही.
-ईडी, सीबीआयची हिंमत आहे का?
ठाकरे पुढे म्हणाले की, मी पुन्हा नव्या दमाने उभा राहिलोय. पुन्हा जिंकणारच. माझा आत्मविश्वास तुम्ही आहात. काही जणांना ते घेऊन गेले. आपल्या ताई होत्या. आपण कितीदा खासदार केले माहितय. या ताईंना धमक्या देण्यात आल्या. मुंबईतल्या दलाल पाठवले जायचे. त्यांच्या आजोबांच्या चेल्या चपाट्यांना अटक झाली. ताई मोठ्या हुशार. त्यांनी थेट पंतप्रधानांना राखी मानली. तो फोटो छापून आणला. त्यानंतर ईडी, सीबीआयची हिंमत आहे का? ही चालूगिरी लोक बघत नाहीत?, असा सवाल त्यांनी केला.
-भाजप नेतेचोर पक्ष
ठाकरे म्हणाले, भाजप आयात पक्ष आहे. त्यांचे विचार, नेते संपलेत. पक्ष भाकड झालाय. काश्मीर ते कन्याकुमारी यादी काढा. स्वतः चंद्रकांत पाटील बोललेत. आम्ही मनावरती दगड ठेवून निर्णय घेतलाय. हा आयात पक्ष. हा पक्षय का चोरबाजार आहे. नेते चोरून घ्यायचे. 40 गद्दार, रेड्यांना प्रश्न विचारतो. त्यांच्यात मर्दानगी शिल्लक असेल, तर त्यांनी सांगावे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नाही. नाव बाळासाहेबांचे पाहिजे, आशीर्वाद मोदींचा पाहिजे.
-त्यावेळी मुंबई शिवसेनेने वाचवली
उद्धव म्हणाले, हे सगळे मिंदे सरकार आहे. राज्यपालांना बॅग पॅक करून पाठवायची वेळ आलीय. राज्यपाल म्हणून आदर बाळगतो. मात्र, तुमच्या काळ्या टोपीखाली जे दडलंय त्याचा मान राखू शकत नाही. महाराजांचा अपमान करत असाल, तर वय कितीही असो घरात बसा. त्यांना जुने आदर्श म्हणात. जुने आदर्श कसे होऊ शकतात. आता अमित शहा म्हणतात आम्ही दंगलखोरांना धडा शिकवला. 2002 नंतर एकही दंगल झाली नाही. 1992-93 साली तुमची पळापळ झाली. तेव्हा बिळात बसलात. त्यावेळी मुंबई शिवसेनेने वाचवली. अमरनाथ यात्रा शिवसेनेने सुरू केली. केवळ शिवाजी महाराज हे दैवत या जिजाऊच्या पोटी जन्माला आले म्हणून आज तुम्ही शिकवायची धडा शिकवल्याची भाषा करताय.
-तर लाथ घालून दिला असता
उद्धव ठाकरे म्हणाले की, अब्दुल गटार. त्याने सुप्रिया सुळेंचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो, तर लाथ घालून दिला असता. जसा एकाला दिला होता. अरे तरी सुद्धा गुळमुळ गुळमुळ. वाघ आहात का गांडूळ आहात. महाराष्ट्र तोडण्याची भाषा, महिलेचा अपमान, उद्योग जातायत. तरीही शेपट्या घालून बसताय. ही कसली बाळासाहेबांची शिवेसना. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही. शेतकरी टाहो फोडतोय. त्यांना विम्याचा पैसा मिळत नाहीय. या चिखलीमधले कोलारा नावाचे गाव आहे. गजानन साळुंकेने पाच एकरमध्ये सोयाबीन लावले. त्याला पाच-सात हजार खर्च आला. मिळाले किती फक्त ३३ रुपये.
–आता माझे उघड आव्हान
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आपण सभा घेतल्यानंतर शरद पवार कृषिमंत्री असताना कर्ज माफी झाली. मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. गंगापूरला गेलो होतो. एका शेतकऱ्याला विचारले, कर्जमुक्ती झाली की नाही. ते म्हणाले तुमच्याबद्दल प्रश्नच नाही. आता माझे उघड आव्हान आहे. काढा ना माझे. खोके सरकार बसल्यापासून पणवती लागलीय. तेव्हापासून हजाराच्या आसपास महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या झाल्यात. कसला नवस फेडताय. ओला दुष्काळ झालाय. कृषिमंत्री म्हणतायत ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही, तर दिवाळीत शेतकरी विचारतोय खायचे काय? आपले पंतप्रधान म्हणून गेले मी दोन-तीन किलो शिव्या घातो. मात्र, शेतकऱ्यांचे पोट कसे भरणार? विमा कंपन्यांची मस्ती एकदा उतरवली होती. पुन्हा उतरवायचे असेल, तर सांगा, असा इशारा त्यांनी दिला.


