पुन्हा या पक्षाचा डंका; देशभरातील पोटनिवडणुकीत बाजी
-भाजप तीन जागी विजयी
प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारच्या मोकामा मतदारसंघात बाहुबली अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांचा विजय झाला आहे. ही जागा राजदच्या खात्यात गेली. तर गोपालगंजमध्ये भाजप उमेदवाराने बाजी मारली. उत्तर प्रदेशच्या गोला गोकर्णनाथ मतदार संघातही भाजपचा विजय झाला आहे. तर तेलंगणातही केंद्रातील हा सत्ताधारी पक्ष कडवी झुंज देत आहे. दरम्यान, अंधेरी पूर्व मतदार संघात शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे.
उत्तर प्रदेशातील गोला गोकर्णनाथ, बिहारच्या मोकामा व गोपालगंज, महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व, तेलंगणातील मुनुगोडे, ओडिशाच्या धामनगर व हरियाणाच्या आदमपूर विधानसभा मतदार संघासाठी गत 3 नोव्हेंबरला निवडणूक झाली होती.
-सर्वाधिक 75.25 टक्के मतदान हरियाणाच्या आदमपूर मतदार संघात झाले होते. तर सर्वात कमी 31.74% मतदान अंधेरी पूर्व मतदार संघात झाले होते. ज्या मतदार संघांत पोटनिवडणूक झाली, त्यातील प्रत्येकी 2 जागा काँग्रेस व भाजपच्या ताब्यात होत्या. तर बीजेडी, शिवसेना व राजदच्या खात्यात प्रत्येकी एक जागा होती.
– गोला गोकर्णनाथमध्ये भाजप विजय
लखीमपूर खीरीच्या गोला गोकर्णनाथ मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अमन गिरी यांचा मोठा विजय झाला आहे. त्यांनी सप उमेदवार विनय तिवारी यांचा 34,298 मतांनी पराभव केला. मार्जिनमध्ये त्यांनी आपले वडील अरविंद गिरी यांचा विक्रमही मोडला आहे. 2022 मध्ये अरविंद गिरी यांनी सपच्या विनय तिवारी यांचा 29294 मतांनी पराभव केला होता.
उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी ट्विट केले होते की, या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अमन गिरी यांना मोठ्या अंतराने विजय मिळवून देणार आहे. पुन्हा एकदा कमळ उमलेल व सायकल पंक्चर होईल. सपच्या गुंडगिरीचा अंत होईल. भाजपच्या सुशासन, विकास व राम राज्याला जनतेचा आशीर्वाद आहे.


