पंतप्रधानांच्या लक्षात आणून देणार स्वतंत्र विदर्भ

पंतप्रधानांच्या लक्षात आणून देणार स्वतंत्र विदर्भ

-अन्यथा पंतप्रधान यांना दाखविणार फलक

प्रतिनिधी
नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीने ११ डिसेंबर रोजी पंतप्रधानांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. वेळ दिल्यास जनतेच्या मागणीचे पत्र सोपविणार आहे. वेळ न दिल्यास पंतप्रधान यांना विदर्भाच्या मागणीचे फलक दाखविण्यात येईल, अशी माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

आमच्या विदर्भात सिंचनाची सोय नाही म्हणून मोठ्या  टक्के वीज निर्मिती होते. शेतकऱ्यांना १२-१२ तासांचे लोडशेडींग सोसावे लागत आहे. २३ प्रकारची विविध खनिजे एकट्या विदर्भात असूनही कारखाने नाहीत. इतर राज्याच्या तुलनेत वीज महाग मिळत असल्याने असलेल्या उद्योगांची पळवाट सुरू आहे. त्यामुळे युवकांचे रोजगाराच्या शोधात मोठ्या प्रमाणात पलायन होत आहे. विदर्भाची ओळख वृद्धाश्रम म्हणून झाली आहे. विदर्भातील २३०० गावे निरंक झाली आहे, असमतोल विकासाने विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद वाढला असून आदिवासी मारतो व आदिवासीच मरतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

बुलढाणा जिल्ह्याती काही गावे मध्यप्रदेशला तर यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावे तेलंगणाला जोडा, अशी स्थानिक नागरिकांनी इच्छा व्यक्त केली आहे. विदर्भात सलग २०२१ व २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान झाले. परंतु महाराष्ट्र सरकार मदत करायलाच तयार नाही. विदर्भातील शेतकरी संकटात सापडलेला आहे.

भारतीय जनता पक्षाचे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहीर आदींनी विदर्भ राज्य निर्मितीचा जागर केला होता. विदर्भाच्या जनतेने आपल्या पक्षाला २०१४ मध्ये भरभरून मते दिली. परंतु सत्तेत आल्यावर विदर्भाचा विसर पडला आहे. १९९७ ला भाजपने भूवनेश्वरच्या अधिवेशनात विदर्भ राज्याच्या निर्मितीचा ठराव पास करूनही विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला गेला नाही ही आमची खंत आहे. संविधानाचे अनुच्छेद ३ नुसार आपण विदर्भ राज्याची निर्मिती करावी आणि विदर्भाच्या जनतेला सुखी, समृद्ध व संपन्न करावे, असे आवाहन पत्रकातून केले आहे.

या प्रसिद्धी पत्रकावर अ‌ॅड. वामनराव चटप, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रकाश पोहरे, रंजना मामर्डे, प्रबिरकुमार चक्रवर्ती, अरुण केदार, मुकेश मासुरकर, विष्णुजी आष्टीकर, तात्या साहेब मत्ते, डॉ. जी. एस. ख्वाजा, प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार, अनिल बोबडे, सुनीता येरणे , किशोर दहेकर, मितीन भागवत, कपिल इद्दे , राजेंद्र आगरकर, प्रकाश लढ्ढा, कृष्णराव भोंगडे, पुरुषोत्तम पाटील, अ‌ॅड. सुरेश वानखेडे आदींनी आवाहन केले आहे.