पंढरपुरात असं काय झालं ?, जिथे भाविक आक्रमक झाले
-दर्शन रांगेत उधळा गोंधळ
प्रतिनिधी
पंढरपूर : मुखी पांडुरंगाचे नाव, मनी विठू दर्शनाचा ध्यास घेत लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. दर्शन रांगेत 24 तास उभे राहूनही विठुरायाचे दर्शन होत नसल्याने पंढरपुरात भाविक चांगलेच आक्रमक झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शासकीय महापूजा झाल्यानंतरही दर्शन रांग पुढे सरकत नव्हती, त्यामुळे भाविक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. याबाबत भाविकांनी पोलिसांनाच जाब विचारत मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली, असा दावा करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय पूजेच्या वेळी दरवर्षी दर्शन रांग बंद ठेवण्यात येते. मात्र, यावर्षी मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुखदर्शनाची रांग पुढे सरकत असली, तरी शासकीय महापूजा झाल्यानंतर देखील मुख्य दर्शन रांग पुढे सरकत नसल्याने भाविक आक्रमक झाले होते.
भाविकांना दर्शनासाठी अडचण नको यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही लावाजमा सोबत न नेता अगदी साध्या पद्धतीने विठुरायाचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला होता. शासकीय पूजेच्या वेळी मुखदर्शन चालू ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. केवळ सहा ते सात मंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पडली. त्यानंतर सत्कार कार्यक्रमात देखील मानपान न पाहता मुख्यमंत्र्यांनी थेट स्वतः भाषण करून कार्यक्रम अर्धा वेळेतच संपवला. मात्र, त्यानंतरही मंदिर समितीकडून दर्शनाचा वेग वाढवण्यात आला नाही.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे दर्शन रांग गतीने पुढे सरकल असे अपेक्षित होते. असे असताना देखील दर्शन रांग पुढे सरकत नसल्याने भाविकांचा संताप वाढत गेला. यातच काही तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यातील काही भाविकांनी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना याबाबत जाब विचारला. त्यानंतर काही भाविकांनी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली.


