पंकजा मुंडेंना या पक्षात येण्याची ऑफर

पंकजा मुंडेंना या पक्षात येण्याची ऑफर

-पंकजा यांचे स्वागतच

प्रतिनिधी
बीड: पंकजा मुंडेंवर भाजपमध्ये अन्याय होत आहे. मात्र, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या कर्तृत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी केले आहे. आमदार सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडेंना ही ऑफर दिली आहे.

शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे गुरुवारी पाथर्डी तालुका दौऱ्यावर आहेत. त्यांनी येथे विविध ठिकाणी शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंकजा मुंडेंच्या नाराजीबाबत विधान केले आहे.

सुनील शिंदे म्हणाले, पंकजा मोठ्या नेत्या

आमदार सुनील शिंदे म्हणाले, पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे त्यांचे मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. पण पंकजा मुंडे भाजपच्या फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होत आहे. हे आम्हाला दिसत आहे. पण हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही. पण त्यांच्या कर्तृत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे यांचे शिवसेना पक्षात स्वागत आहे. असे सुनील शिंदे म्हणाले.

-येत्या काळात पराभव दिसेल

यावेळी सुनील शिंदेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. देशातील सर्वोच्च न्यायालय, ईडी आणि सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्था केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत.

तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना सुनील शिंदे म्हणाले, यांनी 50 आमदारांसह केलेले बंड हे बोके आणि खोक्यांसाठी केलेले असून येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील शिवसैनिकांकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल. शिवसैनिकांसाठी मातोश्री हे मंदिर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच शिवसेनाप्रमुख आणि पक्षप्रमुख आहेत आणि राहतील, असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केले.