नागपूर जि.प.त सत्ता पक्ष फोडणारा तो काँग्रेस सदस्य कोण ?

नागपूर जि.प.त सत्ता पक्ष फोडणारा तो काँग्रेस सदस्य कोण ?
-विरोधकांशी हातमिळवणी करण्यासाठी पुढाकार
प्रतिनिधी
नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यंदा अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तीसाठी आरक्षित आहे. राज्यातील शिंदे पॅटर्न नागपुरात होण्याचा मोठा धोका आहे. यासाठी सत्ता पक्षातील एका बड्या नेत्याने फिल्डिंग लावणे सुरु केली आहे. मर्जीतील सदस्यांना फोन व बैठकांचे सत्र सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्हा परिषदेचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

ही बाब होऊ नये म्हणून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत काँग्रेसच्या सदस्यांना त्यांना ‘सहलीला’ नेले जाणार अर्थात सुरक्षित ठिकाणी हलविणे जाणार असल्याची चर्चा आहे.
अध्यक्षपदासाठी भाजपकडे एकच उमेदवार असून काँग्रेसकडे सात आहेत. अशा स्थितीत स्पष्ट बहुमत असलेल्या काँग्रेसमध्ये गटबाजी होऊ नये याची काळजी घेतली जाते आहे. कॉंग्रेसकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातून अध्यक्षपदासाठी शांता कुमरे, मुक्ता कोकुड्डे, देवानंद कोहळे, प्रीतम कवरे, पिंकी कौरती, नीलिमा उईके आणि शंकर डडमल हे दावेदार आहेत. यातील दोन सदस्यांच्या जातवैधता प्रमाणपत्राची अडचण असल्याचे सांगितले जात आहे. तसेच डडमल एका शिकार प्रकरणात आरोपी आहेत. यात शांता कुमरे सगळ्यात ज्येष्ठ असून त्यांच्याकडे दांगडा अनुभव आहे. मात्र, संध्या गोतमारे, निशा सावरकर आणि आता रश्मी बर्वे असे सलग तीन कार्यकाळ जिल्हा परिषदेला महिला अध्यक्ष मिळाली आहे. त्यामुळे यंदा पुरुषाला संधी मिळणार अशीही जोरदार चर्चा आहे.

तिकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडेही एक महिला सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहे. बहुमत नसले तरी ऐनवेळी आम्ही हा संपूर्ण डाव उलटवू शकतो, असा दावा भाजपनेत्यांकडून करण्यात येत आहे. काँग्रेसमधील काही सदस्य नाराज आहेत. मागील काही काळात त्यांची भाजपशी जवळीक वाढू लागली आहे. आरक्षणामुळे या सदस्यांचा अध्यक्षपदाचा दाला गेला असला तरीसुद्धा उपाध्यक्षपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावल्याचे कळते. वेळप्रसंगी बंडाचाही पवित्रा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस पक्ष ‘अलर्ट’ मोडवर आला आहे.